त्रास झाला नाही तर लशीचा परिणाम नाही, हा गैरसमजच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:11 AM2021-04-21T04:11:17+5:302021-04-21T04:11:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी की नाही? घेतली तर त्रास होतो का? मग न घेतलेलीच बरी! ...

It is a misconception that if there is no problem, then there is no effect of vaccine | त्रास झाला नाही तर लशीचा परिणाम नाही, हा गैरसमजच

त्रास झाला नाही तर लशीचा परिणाम नाही, हा गैरसमजच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी की नाही? घेतली तर त्रास होतो का? मग न घेतलेलीच बरी! मला काहीच झाले नाही, मग कशाला पाहिजे लस? कोरोनाबाधितांची संख्या वाढत असूनही अशा प्रश्नांचे गुऱ्हाळ मात्र संपायला तयार नाही.

या पार्श्वभूमीवर वैद्यकीय क्षेत्रातील काही तज्ज्ञांबरोबर लोकमतने संपर्क साधला. त्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीबाबतचे गैरसमज दूर करताच लस का गरजेची आहे, याचेही सविस्तर स्पष्टीकरण दिले. कोरोनाला हरवायचे असेल तर सर्वांनीच मनात कोणतीही शंका न बाळगता लस घ्यायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले.

* लस घेतल्यावर होणारा त्रास एक किंवा फार तर दोन दिवसांच्या वर टिकत नाही. साध्या औषधांनी तो बराही होतो. त्यामुळे त्रासाचे कारण देत लस टाळणे चुकीचे आहे.

* लशीची अॅलर्जी असणे असे उदाहरण लाखात एक म्हणजे अगदीच दुर्मिळ आहे. लशीची अॅलर्जी आहे, असे काहीच नसते.

* लस म्हणजे तेच विषाणू सौम्य प्रमाणात शरीरात सोडतात. त्यामुळे या प्रकाराशी आपल्याला सामना करायचा आहे, असे शरीरात निश्चित होते. मग त्यानंतर तोच विषाणू अन्य मार्गाने शरीरात प्रवेश करता झाला, तर त्याची मात्रा चालत नाही किंवा अगदी कमी चालते. लस घेण्याचा हा मोठाच फायदा आहे.

* असाध्य आजार असलेल्यांनी प्राधान्याने लस घ्यायला हवी. कोरोना विषाणू अशा कमकुवत झालेल्या गोष्टींवर, त्यातही किडनी वगैरेवर हल्ला करतो.

* कोरोना विषाणू काही वय पाहून हल्ला करत नाही. तो कोणालाही होऊ शकतो. त्यामुळे त्याच्यापासून सुरक्षित राहण्यासाठी लस हाच सध्याचा एकमेव उपाय आहे.

* विषाणू जवळ येऊ नये यासाठी मास्क, सॅनिटायझर, गर्दी टाळणे व लस घेणे ही चतु:सूत्री पाळली तर आपण कोरोनाचा नक्की पराभव करू शकतो.

डॉ. अच्युत जोशी

कन्सल्टिंग फिजीशियन

----//

* लस दिल्यानंतर शरीरात बाहेरून येणाऱ्या विषाणूंच्या विरोधात लढण्यासाठी प्रतिपिंड (अँटिबॉडिज) तयार होतात. कोरोना विषाणूचा प्रतिरोध करण्यासाठी हे गरजेचे आहे.

* लस घेतली तिथे दंड दुखतो. काहींना अंगदुखी किंवा डोके दुखायला लागते. हे प्रमाण कमी आहे. मात्र त्रास झाला की लस परिणामकारक व नाही झाला तर लशीचा उपयोग झाला नाही हा गैरसमज आहे.

* मधुमेह किंवा असा आजार असलेल्यांनी प्राधान्याने लस घ्यायला हवी. त्यांची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते.

* लस घेतली याचा अर्थ कोरोनापासून १०० टक्के सुरक्षित असे नाही. तरीही कोरोना होऊ शकतो, पण त्याची तीव्रता एकदम कमी असेल. मात्र अशी उदाहरणे कमी आहेत.

* कोरोना झाला असेल तर लगेच लस घेऊ नये. त्यातून पूर्ण बरे झाल्यावर साधारण ३ ते ४ महिन्यांनी लस घेणे योग्य आहे.

डॉ. बाळासाहेब देशमुख

अध्यक्ष- इंडियन मेडिकल असोसिएशन, पुणे शाखा

---///

* लस दोन वेळा घेण्यामागे शास्रीय कारण आहे. लशीचे संशोधन झाल्यावर तिचा किती परिणाम लस घेणाऱ्याच्या शरीरावर होणार, म्हणजे किती अँटिबॉडीज तयार होणार हेही निश्चित होत असते. त्यावरून किती डोस द्यायचे हे ठरते. दुसरा डोस हा पहिल्या डोसचा परिणाम वाढवणारा असतो.

* याच कारणासाठी पहिला डोस घेतल्यानंतर दिलेल्या मुदतीनंतर दुसरा डोस घेणे गरजेचे असते. कारण त्यातून पहिल्या डोसमुळे तयार झालेल्या अँटिबॉडीजना बळ मिळणार असते. म्हणूनच पहिला डोस घेतल्यावर दिलेल्या मुदतीत दुसरा डोस घ्यायलाच हवा. त्याशिवाय सुरक्षेचे वर्तुळ तयार होणार नाही.

* पहिला डोस घेतला आणि दिलेल्या मुदतीत दुसरा मिळाला नाही तरी त्याचा दुष्परिणाम काहीच नाही. उलट पहिल्याचा परिणाम दीर्घकाळ टिकणाराच असतो. तीन महिन्यांनंतर दुसरा डोस घेतला तरी चालेल.

* आता काही कंपन्या फक्त एकच डोस पुरेसा असलेल्या लशींचे उत्पादन करत आहेत. त्यावरचे त्यांचे संशोधन पूर्ण झाले आहे. या लसींचा एकच डोस घेतला तरी चालू शकते, कारण ते संशोधनातून ठरलेले असते.

* कोरोना विषाणूचे वैशिष्ट्य म्हणजे तो शरीरातील काही अवयवांवर थेट आघात करतो व ते कमकुवत करतो किंवा त्यांचे कार्य पूर्ण थांबवतो. त्यामुळेच आधीच अनियंत्रित मधुमेह, किडनी किंवा तत्सम आजारांनी कमकुवत झालेल्या रूग्णांनी तर ही लस प्राधान्याने घ्यायलाच हवी.

* लसीकरण ऐच्छिक आहे. पण कोरोना विषाणूचा संसर्ग करण्याचा वेग लक्षात घेता, प्रत्येक नागरिकाने लसीकरण करून घेणे गरजेचेच आहे. ते राष्ट्रीय कर्तव्य आहे, असे समजले गेले तरी हरकत नाही.

- डॉ. सुभाष साळुंखे,

माजी महासंचालक, आरोग्य

विद्यमान तांत्रिक सल्लागार, कोरोना राज्य कक्ष

Web Title: It is a misconception that if there is no problem, then there is no effect of vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.