डिजिटल स्वाक्षरीत सातबारा डाऊनलोड करणे अधिक सोयीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:09 AM2020-12-26T04:09:33+5:302020-12-26T04:09:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महसूल विभागाच्या अत्यंत महत्वकांक्षी ई-फेरफार प्रकल्पातील डिजिटल स्वाक्षरीत जमिनीचे अधिकार अभिलेख राज्यातील सामान्य नागरिकांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महसूल विभागाच्या अत्यंत महत्वकांक्षी ई-फेरफार प्रकल्पातील डिजिटल स्वाक्षरीत जमिनीचे अधिकार अभिलेख राज्यातील सामान्य नागरिकांना सहज उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी तयार केलेल्या महाभूमी पोर्टलवर आता स्टेट बँक ऑफ इंडिया सोबतच बँक ऑफ बडोदाचे आणखी एक पेमेंट गेटवे उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे कोणत्याही सामान्य माणसाला एक पेमेंट गेटवे निवडण्याचे स्वातंत्र्य असेल, या दोन्ही पेमेंट गेटवे वरून डेबिट कार्ड , क्रेडीट कार्ड, नेट बँकिंग, भीम ॲपद्वारे आपले महाभूमिचे खाते रिचार्ज करता येणार आहे. या सुविधेमुळे नागरिकांना अत्यंत सोप्या पद्धतीने डिजिटल स्वाक्षरीत सातबारा व खाते उतारे उपलब्ध होतील.
गेल्या काही महिन्यांत शासनाच्या डिजिटल स्वाक्षरीत साता-बाऱ्याला पुणे, मुंबई, ठाणे नाशिकसह संपूर्ण राज्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या दररोज सुमारे ३० ते ३५ हजार डिजिटल स्वाक्षरीत सातबारा व खाते उतारे डाऊनलोड करून सामान्य नागरिक वापरू लागले आहेत. तसेच शासनाने हे सर्व डिजिटल स्वाक्षरीत अभिलेख सर्व शासकीय व कायदेशीर कामासाठी ग्राह्य राहतील असे जाहीर केले असल्याने डिजिटल स्वाक्षरीत सातबारा व खाते उताऱ्यांची मागणी वाढलेली दिसते. त्यामुळे सामान्य माणसाच्या वेळ, श्रम व पैश्याची मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. आता फक्त १५ रुपये भरून राज्यातील कोणताही ७/१२ आपण डाऊनलोड करू शकता. सध्या राज्यातील २ कोटी ५३ लक्ष ७/१२ पैकी २ कोटी ५१ लक्ष ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत झाले असून, त्यासाठी महसूल विभागातील तलाठी मंडळ अधिकारी यांचे सर्वच महसूली अधिकारी यांनी रात्रंदिवस कष्ट घेतले आहेत. महसूल विभागात ही सुविधा 24 तास उपलब्ध करून दिली आहे.