संस्कृतीचे सेतुबंध समजून घेणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:16 AM2021-03-04T04:16:00+5:302021-03-04T04:16:00+5:30
पुणे : आपला देश परंपरानिष्ठ आहे. लोकदैवताचे शक्तीस्थानात रूपांतर होणे ही प्रक्रिया समाजमनाला उर्जा देणारी आहे. यातूनच सांस्कृतिक बंध ...
पुणे : आपला देश परंपरानिष्ठ आहे. लोकदैवताचे शक्तीस्थानात रूपांतर होणे ही प्रक्रिया समाजमनाला उर्जा देणारी आहे. यातूनच सांस्कृतिक बंध निर्माण झाले आहेत. देशाचे सामाजिक, सांस्कृतिक विघटन टाळण्यासाठी संस्कृतीचे सेतुबंध समजून घेणे गरजेचे आहे, असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.
स्वामी कृपा सभागृहात गुरुकुल प्रतिष्ठानच्या वतीने 'तिरुपती बालाजी' या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमात विश्वकर्मा पब्लिकेशनचे मनोहर सोनवणे आणि दीपक करंदीकर लिखित ‘तिरुपती’ या कादंबरीचे प्रकाशन जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संत साहित्याचे अभ्यासक अभय टिळक, प्रा. रमण चितळे, समीक्षक रुपाली शिंदे, प्रा. श्याम भुर्के, विश्वकर्मा पब्लिकेशनचे विशाल सोनी, गुरुकुल प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष कृष्णा राजाराम अष्टेकर, अध्यक्ष अशोक कामत आदी उपस्थित होते.
टिळक म्हणाले, ‘आपल्याकडे अवतार ही संकल्पना आहे. म्हणजेच पूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी एकतत्त्व काळाच्या टप्प्यावर पुन्हा पुन्हा अवतीर्ण होत राहणे असे आहे.’ महाराष्ट्रातला भक्तियोग कर्मयोगावर आधारित आहे. मराठी माणसानं स्वीकारलेली दैवतं पाहिल्यावर ते लगेच लक्षात येतं. या कारणांचा विचार केल्यास तिरुपती बालाजीपेक्षा पांडुरंग मराठी माणसानं का स्वीकारला, याचे उत्तर मिळते, असे भुर्के यांनी सांगितले.
‘ऐतिहासिक आणि पौराणिक कादंब-या हे मराठी भाषेचे वैभव आहे. ललित शैलीत या कहाण्या सामान्य माणसांपर्यंत पोचल्यास भाषिक-पौराणिक अनुबंध सुदृढ होतील, असे डॉ. कामत यांनी सांगितले. कार्यक्रमात राधिका चितळे यांना आदर्श गृहिणी पुरस्कार, उषा माडेकर आणि डॉ. सुनिता दिवाकर यांना आदर्श सहधर्मचारिणी पुरस्कार तर पंडित वसंत गाडगीळ यांना आदर्श समाजशिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. निवेदन प्रा. रवींद्र कोठावदे यांनी केले. डॉ. भालचंद्र कापरेकर यांनी आभार मानले.