उन्माद वाढवणे देशहिताचे नाही!- कुमार सप्तर्षी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 02:54 AM2019-03-03T02:54:38+5:302019-03-03T02:55:19+5:30
देश सर्वांचा आहे ही भावना जपायला हवी. आपण मुस्लीमद्वेष करणार, तिकडून हिंदूद्वेष होणार हे देशासाठी हिताचे नाही.
- कुमार सप्तर्षी
देश सर्वांचा आहे ही भावना जपायला हवी. आपण मुस्लीमद्वेष करणार, तिकडून हिंदूद्वेष होणार हे देशासाठी हिताचे नाही. निसर्गत: पर्यावरणासाठी दोन्ही देश एकमेकांवर अवलंबून आहेत. द्वेषभावना विसरून दोन्ही देशांनी एक युनिट केले, तर कितीतरी चांगल्या गोष्टींना चालना देता येऊ शकते.राज्यात संपूर्ण भारतीय जनतेला युद्धज्वर चढल्याचे दिसते आहे. ते साहजिकही आहे. देशप्रेमाची भावना त्यावरच पोसली गेली असेल, तर दुसरे काहीही होणार नाही. द्वेषाच्या आधारावरची कोणतीही विचारसरणी टिकणारी नसते, तसेच धर्माच्या आधारावरचीही टिकत नाही.
सीआरएफचे जे ४२ जवान शहिद झाले त्यात कोणी एकाच धर्माचे होते का? हिंसा कधीच यशस्वी होत नाही हे आपल्याकडे गौतम बुद्धांनी कितीतरी वर्षांपूर्वी सांगितले. महात्मा गांधींचा विचार जगभरात मान्य होतो याचे कारणही हेच आहे. द्वेषभावना संपवली पाहिजे. आपण आपल्या सीमांचा तरी विचार करणार आहोत की नाही. हिमालय वगळता अन्य सर्व ठिकाणी आपल्या सीमा वेगवेगळ्या धर्मांनी बांधल्या गेलल्या आहेत. लडाख बौद्ध, नॉर्थ इस्ट ख्रिश्चन असे आहे. म्हणून तरी आपण द्वेषभावना सोडायला हवी.
इंदिरा गांधी यांनी अणुबॉम्ब तीन तासात तयार करता येईल अशा स्थितीपर्यंत आणला, मात्र तयार केला नाही. अटलबिहारी वाजपेयी यांनी तो तयार केला व त्यानंतर पाकिस्ताने तो पंधरा दिवसात बनवला. त्यांच्याकडे तीन शहरे आहेत, आपल्याकडे पाच शहरे आहेत, ज्यावर दोन्ही देश केवळ अडीच मिनिटात बॉम्ब टाकू शकतात. त्यांचे १ कोटी लोक जातील,
आपले ४५ कोटी जातील. इतके हे भयानक आहे. उन्माद वाढवता कामा नये, त्यात विनाश आहे.
>युद्धापेक्षा चांगली शांतीवार्ताच
१९९१ व २००८ साली भारतीय अर्थव्यवस्था संकटात होती, तरीही भारत सरकारने रिझर्व्ह बँकेकडे रिझर्व्ह कोटा म्हणून असलेली मागितला नाही. २०१८-१९ साली भारत सरकारने तो कोटा मागितला. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी घरगुती कारणे सांगून राजीनामा दिला; परंतु, रिझर्व्ह कोटा दिला नाही. नवीन गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रिझर्व्ह बँकेचा रिझर्व्ह कोटा भारत सरकारला दिला. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था १९९१ व २००८ पेक्षा वाईट आहे. भारत सरकारला एक लाख सैन्य कपात करायची आहे. या स्थितीत युद्ध मुर्खपणा आहे. पाकिस्तानी अर्थव्यवस्था भारतापेक्षा वाईट आहे. म्हणून दोघांसाठी युद्धा पेक्षा शांतिवार्ताच चांगली आहे.
- झेनझो कुरिटा,
१०४, रेल्वे लाईन, सोलापूर.
>डोकं ठिकाणावर
ठेवून विचार करा
उद्या जर भारत-पाक युद्ध झाले आणि दोन्ही देशांनी त्यांच्या एक तृतीयांश न्युक्लीअर बॉम्बचा (१००) वापर केला तरी दोन कोटींपेक्षा जास्त नागरिक मरतील आणि अर्धा ओझोनचा थर नष्ट होईल. ज्यामुळे अल्ट्राव्हायोलेट किरणांचा शिरकाव थेट पृथ्वीच्या वातावरणात होईल. त्यामुळे कॅन्सरसारख्या अनेक आजारांबरोबर पृथ्वीच्या तापमानात प्रचंड वाढ होईल. त्यामुळे जगभरात दोन अब्ज नागरिक प्रभावित होतील. भारतीय उपखंडात ज्यामुळे सुबत्ता आहे तो मान्सून नष्ट होऊ शकतो. त्यामुळे युद्धखोरीची भाषा करणारी माध्यमं आणि करमणूक म्हणून युद्धाकडे बघणाऱ्यांनी युद्ध झालं तर काय होईल, हा विचार जरा आपल डोकं ठिकाणावर ठेऊन करावा.
- शिवराज दिलीप बालघरे
चिंचोली, देहूरोड, जि. पुणे.