...आता परीक्षेला उशिरा नाही येता येणार
By admin | Published: May 31, 2017 03:53 AM2017-05-31T03:53:19+5:302017-05-31T03:53:19+5:30
दहावी-बारावीच्या परीक्षेला काही मिनिटे शिल्लक असताना प्रश्नपत्रिकांचे मोबाइलमध्ये फोटो काढून ते व्हॉटस्अॅपवर व्हायरल करण्याच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दहावी-बारावीच्या परीक्षेला काही मिनिटे शिल्लक असताना प्रश्नपत्रिकांचे मोबाइलमध्ये फोटो काढून ते व्हॉटस्अॅपवर व्हायरल करण्याच्या प्रकाराला आळा घालण्याबाबत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कडक उपाययोजना करण्यात येणार आहे. व्हॉटस्अॅपवरून पेपर फोडणारे विद्यार्थी परीक्षेला मुद्दामहून उशिरा येत असल्याचे निष्पन्न झाल्याने यापुढे उशिरा येणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा नाही, याबाबत राज्य मंडळ विचार करीत असल्याचे मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
याबाबत गंगाधर म्हमाणे म्हणाले, ‘‘पेपरफुटीला आवर घालण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहेत. समितींच्या शिफारशीनुसार याबाबत कडक उपाययोजना केल्या जातील. त्याचबरोबर ज्या ठिकाणांहून या प्रश्नपत्रिका फुटल्याचे निष्पन्न होईल त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे.’’
विद्यापीठांप्रमाणे परीक्षा केंद्रांना आॅनलाइन पद्धतीने प्रश्नपत्रिका काही वेळ अगोदर पाठविण्याचा पर्याय मात्र राज्य मंडळाला वापरता येणे शक्य नसल्याचे म्हमाणे यांनी स्पष्ट केले. मंडळाच्या प्रश्नपत्रिका या दहा ते बारा पानांच्या असतात, त्याचबरोबर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूपच मोठी असते. त्यामुळे इतक्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या दिवशी झेरॉक्स काढून प्रश्नपत्रिका वाटप करणे वास्तविक पातळीवर अत्यंत अवघड असल्याचे त्यांनी सांगितले.