उमेदवार आणि विकासकामे याचा संबंध नाही : बापट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 12:22 AM2019-04-05T00:22:50+5:302019-04-05T00:23:12+5:30
अजित पवारांना हे सांगायला लागू नये
पुणे : ‘विकास कामे केली म्हणता तर मग उमेदवार का बदलला’ या राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या टिकेला भाजपाचे उमेदवार गिरीश बापट यांनी ‘उमेदवार बदलणे आणि विकासकामे यांचा काहीही संबध नसतो, हे पवार यांना मी सांगायचे का’, असे प्रत्युत्तर दिले. उमेदवार बदलणे हा पक्ष नेतृत्त्वाचा निर्णय असतो असे ते म्हणाले.
भाजपाने विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांना उमेदवारी नाकारून ती बापट यांना दिली. त्यावर पवार यांनी टीका केली होती. विकासकामे केली असे सांगता तर मग उमेदवार बदलण्याची वेळ का आली तेही सांगा असे पवार म्हणाले होते. त्यावर बोलताना बापट म्हणाले, ‘‘अजित पवार यांना पक्षांची उमेदवार ठरवण्याची पद्धत माहिती असायला हवी. ती मी सांगायला नको. विकास कामे आम्ही केली आहेतच व ती दिसतही आहेत. उमेदवार बदलण्याचा निर्णय पक्षस्तरावर होत असतो. तसा तो झाला, त्याच्याशी विकासकामांचा काहीही संबध नाही.’’
कसबा मतदारसंघातून काढलेल्या पदयात्रेची माहिती बापट यांनी दिली. भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, आमदार विजय काळे, शिवसेनेचे शहराध्यक्ष चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर यावेळी उपस्थित होते. बापट यांच्या प्रचारासाठी तयार केलेल्या डीजीटल डिस्प्ले व्हॅनचे यावेळी गोगावले यांच्या हस्ते उद््घाटन करण्यात आले.