हनुमानाची जात काढणे चुकीचे नाही - अॅड. भास्करराव आव्हाड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 01:38 AM2018-12-29T01:38:39+5:302018-12-29T01:38:51+5:30
हल्ली हनुमान कोण? असा वाद सुरू आहे. पूर्वी एकच धर्म होता, तो म्हणजे वैदिक धर्म. रामायण साडेसहा हजार वर्षांपूर्वी घडले. हनुमान हा वैदिक कालखंडात होऊन गेला.
पुणे : हल्ली हनुमान कोण? असा वाद सुरू आहे. पूर्वी एकच धर्म होता, तो म्हणजे वैदिक धर्म. रामायण साडेसहा हजार वर्षांपूर्वी घडले. हनुमान हा वैदिक कालखंडात होऊन गेला. त्यावेळी अन्य धर्म नव्हते. हनुमान दंडकारण्यात राहणारा होता, म्हणूनच अन्य धर्म त्यानंतर उदयाला आले असल्याने त्याला कुणी मुस्लिम किंवा जाट म्हणत असतील तर ते चुकीचे नाही. कारण वैदिक धर्मातूनच त्यांची उत्पत्ती झाली, असे मत ज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव आव्हाड यांनी व्यक्त केले.
वडगावशेरी येथील श्री साई प्रतिष्ठान आणि विश्वशांती बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ८ व्या राज्यस्तरीय निमंत्रितांचे कविसंमेलन हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट येथील मराठा चेंबर्स आॅफ कॉमर्स येथे आयोजिण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी रंगत-संगत प्रतिष्ठान व आडकर फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर यांना नाट्यसंंमेलनाध्यक्ष कीर्ती शिलेदार यांच्या हस्ते ‘श्री साई जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ आणि मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. ‘रंग जीवनाचे’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांना ‘प्रेरणा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड. भास्करराव आव्हाड, प्रमुख पाहुणे म. सा. प.चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, साई प्रतिष्ठान वडगावशेरीचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे आयोजक संजय चौधरी, दादासाहेब सोनावणे, हेमंत गलांडे उपस्थित होते.
डी. डी. सोनावणे यांनी प्रास्ताविक केले. शिक्षक संतोष हिंगणे आणि प्रा. रुपाली अवचरे यांनी सूत्रसंचालन केले. आयोजक संजय चौधरी यांनी आभार मानले.
आव्हाड म्हणाले, की साहित्यिकांना कमी मानधन मिळते. त्यांच्या कामाचे मोल कमी असले तरी मूल्य अधिक असते. म्हणून मूल्य जोपासायचे काम केले पाहिजे.