तंत्रज्ञानाने आव्हानांचा सामना करणे शक्य
By admin | Published: February 19, 2016 01:40 AM2016-02-19T01:40:46+5:302016-02-19T01:40:46+5:30
आॅटोमोबाईल क्षेत्रात गेल्या काही वर्षांत फार मोठी प्रगती झाली आहे. हे क्षेत्र आता प्रत्येक आधुनिक नागरिकाच्या जगण्याचा भाग झाला आहे
पुणे : आॅटोमोबाईल क्षेत्रात गेल्या काही वर्षांत फार मोठी प्रगती झाली आहे. हे क्षेत्र आता प्रत्येक आधुनिक नागरिकाच्या जगण्याचा भाग झाला आहे, त्यामुळेच या क्षेत्रासमोर अनेक आव्हाने तयार झाली असून, तंत्रज्ञानाच्या साह्याने त्याचा सामना करता येईल, असे प्रतिपादन पीएमपीएलचे सहव्यवस्थापक द. गा. मोरे यांनी केले.
पुण्यातील आॅटोमोबाईल क्षेत्राशी निगडित विविध कंपन्यांच्या वतीने आयोजित आॅटो एक्स्पो प्रदर्शनाचे उद््घाटन मोरे यांच्या हस्ते झाले. संयोजक पी. एन. आर. राजन, किशोर पिंगलीकर, प्रभाकर घोडेकर, प्रकाश कुलकर्णी आदी या वेळी उपस्थित होते. राजन म्हणाले, ‘‘या क्षेत्रातील प्रगतीची सर्वसामान्यांना माहिती व्हावी, या हेतूने सन १९९२ मध्ये पहिले प्रदर्शन आयोजित करण्यात आले. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर या क्षेत्रातील विविध कंपन्यांना सामावून घेत प्रदर्शनाची व्याप्ती वाढवली गेली. आता अशी अनेक प्रदर्शने ठिकठिकाणी आयोजित होत असतात. त्यात वेगळेपणा आणायचा, या उद्देशाने आम्ही अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनाही यात संधी देण्यास सुरुवात केली. यावर्षी १५ पेक्षा अधिक महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी आपले प्रकल्प प्रदर्शनात सादर केले आहेत.’’
पिंगलीकर यांनी विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचा उद्देश स्पष्ट करून, त्याचा फायदा होत असल्याचे सांगितले. मोरे यांच्या हस्ते परिवहन विभागातील विनाअपघात सेवा करणारे चालक आर. डी. देवगिरीकर, जी. एम. मोहिते तसेच पीएमपीएमएलचे चालक चंद्रशेखर भंडारी, प्रभाकर दिघे यांचा सत्कार करण्यात आला. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित हे प्रदर्शन २१ फेब्रुवारीपर्यंत रोज सकाळी ८ ते सायंकाळी ८ पर्यंत खुले राहणार आहे. (प्रतिनिधी)