वाहतूक नियमांचे पालन करणे आपल्या सर्वांची जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:11 AM2021-01-23T04:11:36+5:302021-01-23T04:11:36+5:30
इंदापूर : रस्त्यांवर वाहने चालवत असताना, प्रत्येकाने वाहनातील सीटबेल्ट, हेल्मेट नियमित वापरणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मद्यपान करून होणारी वाहतूक ...
इंदापूर : रस्त्यांवर वाहने चालवत असताना, प्रत्येकाने वाहनातील सीटबेल्ट, हेल्मेट नियमित वापरणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मद्यपान करून होणारी वाहतूक टाळणे आवश्यक असून, रस्त्यांवरून वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे मत जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती तथा विद्यमान सदस्य प्रवीण माने यांनी व्यक्त केले.
इंदापूर शहरातील बाबा चौक येथे महामार्ग पोलीस इंदापूर तसेच इंदापूर पोलीस वाहतूक शाखा यांच्या वतीने रस्ता सुरक्षा मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन प्रवीण माने यांच्या हस्ते झाले. या वेळी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक बी. व्ही. भुसनूर, सहायक पोलीस निरीक्षक धनवे, पोलीस उपनिरिक्षक विठ्ठल कदम, पोलीस कॉन्स्टेबल महेश माने, पोलीस नाईक विनोद मिसाळ, कॉन्स्टेबल गवळी, पोलीस नाईक बनसोडे, पोलीस नाईक जगताप, पोलीस नाईक कदम , सामजिक कार्यकर्ते सुग्रीव बोंगाणे, पांडुरंग मारकड उपस्थित होते.
इंदापूर महामार्ग पोलीस मदत केंद्राकडून देखील वाहतुकीच्या नियम व सुरक्षित प्रवासाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी इंदापूर महामार्ग पोलीस मदत पथकाकडून जनजागृती रथ बनवला असून, संपूर्ण तालुक्यात रथ मिरवण्यात येणार आहे.
तसेच १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या कालखंडात इंदापूर तालुक्यासह पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनचालकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्यात येणार असून, महामार्ग वाहतूक, रहदारीविषयक सूचना महामार्ग पोलीस मदत केंद्राकडून सर्व नागरिकांना देण्यात येणार आहेत.
२२ इंदापूर वाहतूक
इंदापूर बाबा चौक येथे रस्ते वाहतूक सुरक्षा बाबत जनजागृती करताना प्रवीण माने व इतर.