Rupali Patil: जातीपातीला खत पाणी घातले हा गंभीर गुन्हा; समीर वानखेडेंवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 03:05 PM2021-11-19T15:05:14+5:302021-11-19T15:05:34+5:30
समीर वानखेडे धर्माने मुस्लीम आहेत. ही बाब समोर आणण्यासाठी मलिक यांनी थेट समीर वानखेडे यांच्या शाळेचा दाखलाच सादर केला होता
पुणे : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या विरोधात आरोप करणे अजूनही थांबवले नाही. त्यांनी काल पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत समीर वानखेडेंवर हल्लाबोल केला होता. समीर वानखेडे धर्माने मुस्लीम आहेत. ही बाब समोर आणण्यासाठी मलिक यांनी थेट समीर वानखेडे यांच्या शाळेचा दाखलाच सादर केला होता. मलिकांनी सादर केलेल्या दोन्ही दाखल्यांमध्ये वानखेडे मुस्लिम असल्याचं नमूद केलं आहे. दोन्ही दाखल्यांमध्ये समीर दाऊन वानखेडे असे नाव लिहिल्याचे दिसून येत आहे. त्यावर मनसेच्या रुपाली पाटील यांनी वानखेडे चुकीचे असल्याचे सांगितले आहे. ''सरकारी अधिकाऱ्याने खोटी जात लावून नोकरी घेतली. समाजात तेढ निर्माण केले. जातीपातीला खत पाणी घातले हा गंभीर गुन्हा आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहीजे अशी फेसबुक पोस्ट त्यांनी केली आहे.
पाटील म्हणाल्या, हिंदू असो की मुस्लिम काही फरक पडत नाही. माणूस जन्मला म्हणजे तो कोण ना कोण असणारचं. पण सरकारी अधिकाऱ्याने खोटी जात लावून नोकरी घेतली. समाजात तेढ निर्माण केले. जातीपातीला खत पाणी घातले हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे वानखेडेंवर गुन्हा दाखल झालाच पाहीजे. असे त्या म्हणाल्या आहेत.
''समीर वानखेडे किंवा त्या विभागाचे नियुक्त अधिकारी यांनी या बाबत खुलासा केला. तर कायदेशीर कारवाई होईल. सरकारी अधिकारीच गुन्हेगार असतील तर समाजात न्याय निवडा देणे अवघडच आहे.''
वानखेडेंना निलंबित करा
''आता समीर वानखेडे यांचे वडील मुस्लिम आहेत. तर समीर वानखेडे मुस्लिमच असणारचं. वानखेडे यांनी दुसरा धर्म स्वीकारला असेल तरी त्या धर्माला जातीच्या सवलती मिळत नसतात. म्हणजेच समीर वानखेडे यांनी नोकरी साठी खोटा दाखल दाखवून नोकरी मिळवली. त्यांनी पदाचा गैरवापर करून समाजात जातीपाती वरून तेढ निर्माण केल्याचे दिसून येते. त्यामुळे त्वरित गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि समीर वानखेडे यांना निलंबित केले पाहिजे असेही त्या म्हणाल्या आहेत.''
मलिक यांना ट्विट करण्यापासून रोखावे
समीर वानखेडे यांच्या विरोधातील आणखी काही पुरावे नवाब मलिकांनी सादर केले. आपण घटस्फोट दिलेली पत्नी आपल्याविरोधात उभी राहू शकते या भीतीपोटी वानखेडे यांनी तिच्या चुलत भावाला एका ड्रग पेडलरमार्फत अडकविले, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच वानखेडे यांच्या शेजारी राहणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याशी त्याचा वाद झाल्यानंतर या अधिकाऱ्याच्या मुलालाही खोट्या प्रकरणात अडकवण्यात आले, असा दावा मलिकांनी केला. वानखेडे यांच्या वडीलांनी नवाब मलिक यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला आहे. तसेच ट्विट करण्यापासून रोखावे, अशीही मागणी कोर्टापुढे केली आहे.