"अखेरच्या श्वासापर्यंत साथ देणारा जीवनसाथी मिळायला भाग्य लागतं", पत्नीची पतीसाठी किडनीदान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 02:02 PM2023-02-14T14:02:23+5:302023-02-14T14:02:43+5:30

पत्नीने स्वत:ची किडनी पतीला देऊन मृत्यूच्या दाढेतून बाहेर आणले

It takes luck to find a life partner who will support you till the last breath wife donates kidney | "अखेरच्या श्वासापर्यंत साथ देणारा जीवनसाथी मिळायला भाग्य लागतं", पत्नीची पतीसाठी किडनीदान

"अखेरच्या श्वासापर्यंत साथ देणारा जीवनसाथी मिळायला भाग्य लागतं", पत्नीची पतीसाठी किडनीदान

googlenewsNext

प्रशांत ननवरे

बारामती : स्वत:ची किडनी पतीला देऊन मृत्यूच्या दाढेतून बाहेर आणणाऱ्या इंदापुर तालुक्यातील आधुनिक सावित्रीचे सर्वत्र कौतुक होत आहे. सध्या प्रेम आणि मैत्रीचे नाते गुंफण्याचे वेगवेगळे ‘डे’ज सुरु आहेत. मात्र, आकर्षणापोटी केवळ खऱ्या प्रेमाच्या आणाभाका घेऊन चालत नाहित. तर ते शेवटच्या श्वासापर्यंत निभवावे लागते. याबाबत इंदापुर तालुक्यातील आधुनिक सावित्रीने चांगलाच आदर्श वस्तुपाठ मांडला आहे.

बकुळा दिपक कुंंभार (रा.बेलवाडी,कुंभार वस्ती,ता.इंदापुर) असे या आधुनिक सावित्रीचे नाव आहे. बकुळा या टकलेवस्ती (लासुर्णे) जिल्हा परीषद शाळेत शिक्षिका आहेत. त्यांनी त्यांचे पती दिपक कुंभार यांना स्वत:चे मूत्रपिंड दिले आहे. दिपक कुंभार हे इंदापुर पंचायत समितीमध्ये ग्रामसेवक म्हणुन कार्यरत आहेत.

कुंभार दांपत्याचा विवाह मे २००२  मध्ये झाला. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. दोघांचाही सुखी संसार व्यवस्थित सुरू होता. मात्र, १८ वषार्नंतर त्यांच्या सुखी संसारास नजर लागली, कुंभार ( वय ४६ ) यांना कोविडकाळात २०२० मध्ये  मुत्रपिंडाचा त्रास सूरु झाला. त्यांनी विविध ठीकाणी वेगवेगळे उपचार घेतले. मात्र,दवाखाना कमी न होता तो वाढतच गेला. विविध तपासण्या केल्यानंतर दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर दिपक यांना बारामती शहरातील खासगी रुग्णालयात जानेवारी २०२२ मध्ये आठवड्यातून तीन वेळा डायलिसिस सुरु करण्यात आले. डायलिसीस बंद करण्यासाठी दिपक यांनी एका खडतर प्राचीन उपचारांचा अवलंब केला. काही दिवस डायलिसिस बंद करण्यात त्यांना यश देखील आले. मात्र,त्यांना पुन्हा शारीरीक त्रास वाढला,असह्य झाला. त्यावर डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपणाचा उपाय सांगितला. त्या गोष्टीचा विचार करून बकुळा यांनी स्वत: किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. आवश्यक त्या सर्व तपासण्या करून प्रत्यारोपण करण्यासाठी कायदेशीररीत्या सर्व प्रक्रिया पूर्ण केली. तामिळनाडु येथील कोईमतूर येथे २५ नोव्हेंबर २०२२ रोजी किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. डॉ.देवदास माधवन, डॉ.विवेक पाठक, डॉ.माधव यांच्या निगराणीखाली शस्त्रक्रिया पार पडली. आता कुंभार दांपत्याची प्रकृती ठणठणीत आहे.

दिपक यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले कि, माझ्या जीवघेण्या आजारातून आज केवळ माझ्या पत्नीमुळे बाहेर आलो आहे. तिने मोठ्या धाडसाने स्वत:ची किडनी देवुन मला जीवनदान दिले आहे. माझे कुटुंब तिने मोठ्या संकटातून बाहेर काढले. शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणारा जीवनसाथी मिळायला मोठ भाग्य लागत.मी त्या भाग्यवान पुरुषांपैकी एक आहे. कठीण काळात मित्र आणि नातेवाईकांसह तालुका गटविकास अधिकारी, जिल्हा परीषद अधिकारी, ग्रामसेवक संघटनेची मोलाची मदत झाल्याचे दिपक यांनी यावेळी नमुद केले.

Web Title: It takes luck to find a life partner who will support you till the last breath wife donates kidney

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.