SSC Result: पुण्यातील पठ्ठ्याची कमाल! सर्व विषयात ३५ गुण; पोलीस बनून देशसेवा करायचं स्वप्न
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 05:07 PM2022-06-17T17:07:18+5:302022-06-17T18:45:43+5:30
दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यावर राज्यातील अनेक शाळांबाहेर जल्लोषाचे वातावरण
पुणे : आजच दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे. राज्यातील अनेक शाळांबाहेर जल्लोषाचे वातावरण दिसून येत आहे. पालक, विद्यार्थी तसेच शिक्षक एकमेकांचे अभिनंदनही करताना दिसत आहेत. राज्याचा निकाल ९६.९४ टक्के लागला आहे. कोकण विभागाने यंदा दहावीच्या निकालात बाजी मारली आहे. अनके जिल्ह्यात तर मुली या मुलांपेक्षा सर्वश्रेष्ठ ठरल्या आहेत. पुणे जिल्ह्याचा निकालही ९६.७४ टक्के लागला आहे. मुलामुलींमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. काही विद्यार्थ्यांना ८०, ९० टक्के मिळाले आहेत. तर काही जण उत्तम मार्कानी पास झाले आहेत. त्यातच पुण्यातील एका पट्ठ्याने सर्व विषयात ३५ गुण मिळवले आहेत. शुभम जाधव असे या होतकरू विद्यार्थ्याचे नाव आहे. त्या अनुषंगाने लोकमतने शुभमशी संवाद साधला. त्यावेळी दहावीत ३५ टक्के मिळवायला लक लागतं. पण पोलीस बनून पुढे देशसेवा करण्याचे माझे स्वप्न असल्याची प्रतिक्रिया त्याने दिली आहे.
शुभम हा एका होतकरू कुटुंबातील विद्यार्थी आहे. तो न्यू इंग्लिश स्कुल रमणबाग या शाळेत शिकत आहे. हातावर पोट असणाऱ्या या कुटुंबात त्याने हे यश मिळवून दाखवले आहे. शुभम दिवसभर हार्डवेअरच्या दुकानात काम करतो. त्यानंतर सायंकाळी घरी येऊन तो दहावीचा अभ्यास करत असे.
दहावीत ३५ टक्के गुण मिळवल्याबाबत शुभमला काय वाटते असे विचारल्यावर तो म्हणाला, मला आनंद झाला पण एवढा नाही. मला ६० - ५० टक्कयांची अपेक्षा होती. पण तेवढे मिळले नाहीत. मी पास झाल्याने समाधानी आहे. माझे मित्र ५० टक्कयांच्या वर आहेत. पण मी त्यांच्यापेशा खाली असल्याचे थोडे दुःख वाटते. पण दहावीत ३५ टक्के मिळवायला लक लागते. असे तो म्हणाला आहे.
''पुढे मी वाणिज्य शाखेत प्रवेश घेणार आहे. मला भविष्यात पोलीस होयच आहे. मला देशासाठी चांगलं काहीतरी करण्याची इच्छा असल्याने मी पोलीस होण्याचा विचार केला आहे असेही त्याने यावेळी सांगितले आहे.''
आम्ही शुभमच्या पाठीशी आहोत
शुभम हा एक होतकरू मुलगा आहे. तो अत्यंत खडतर परिस्थितीत पास झालाय. तो नेहमी सकारात्मक विचार करत असतो. म्हणून त्याला मार्कांचे काही वाटत नाही. त्याला दहावीला ३५ गुण मिळाले आहेत. १२ वीला तो अजून अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवेल. इथून पुढील त्याच्या सुखदुःखात आम्ही मदत करत राहू. अशी प्रतिक्रिया त्याच्या घराजवळील लोकांनी दिली आहे.