पोट साफ व्हायला लागायचा १ तास; शस्त्रक्रियेनंतर मिटला त्रास, अमेरिकन मुलावर पुण्यात उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 04:38 PM2024-09-03T16:38:29+5:302024-09-03T16:40:58+5:30
पुण्यातील अद्ययावत वैद्यकीय उपचारांबद्दल माहिती असल्याने त्यांनी पुण्यात येऊन येथील हिलिंग हँड्स क्लिनिकमध्ये शस्त्रक्रिया केली आणि जेरेमीची मूळ त्रासापासून सुटका झाली
पुणे : अमेरिकेच्या २० वर्षीय जेरेमी बेनाइटला तब्बल तासभर शौचास बसल्याशिवाय त्याचे पोट साफ व्हायचे नाही, कारण त्याला ‘रेक्टल प्रोलॅप्स’ (गुदभ्रंश)चा त्रास हाेता. अमेरिकेत वेगवेगळ्या डॉक्टरांनी तपासले, चाचण्या केल्या आणि उपचारही केले, तरीही मूळ दुखणे काही केल्या बरे होईना. आता काेठे जायचे हे त्यांना कळेना. अखेर त्यांना पुण्यातील अद्ययावत वैद्यकीय उपचारांबद्दल माहिती असल्याने त्यांनी पुण्यात येऊन येथील हिलिंग हँड्स क्लिनिकमध्ये शस्त्रक्रिया केली आणि जेरेमीची मूळ त्रासापासून सुटका झाली.
पूर्वी चांगले उपचार व्हावेत, म्हणून भारतातून नागरिक अमेरिकेमध्ये जात असत. मात्र, आता पुणे हे अद्ययावत उपचारांसाठी आंतरराष्ट्रीय मेडिकल हब बनू पाहत आहे, म्हणून परदेशी नागरिक पुण्यात उपचारांना पसंती देताना दिसून येत असल्याचे या उदाहरणांवरून दिसून येते. तसेच, परदेशाच्या तुलनेत आपल्याकडील दर्जेदार उपचार स्वस्त असल्याने ही संख्या वाढल्याचे दिसून येते.
‘रेक्टल प्रोलॅप्स’चा (गुदभ्रंश) विकार जन्मतः असू शकतो. तसेच, बऱ्याच दिवसांपासूनची बद्धकोष्ठता किंवा पोट साफ करताना जास्त जोर लावावा लागणे, खूप दिवस सुरू असलेला खोकला किंवा मेंदूविकारामुळे हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. साेबत जेरेमीला मूत्रविसर्जनातही अडथळे होते. याला वैद्यकीय परिभाषेत ‘अँनोल्ड चियारी सिंड्रोम’ म्हटले जाते. या आजारांमुळे त्याचे शिक्षण थांबले होते. घराबाहेर पडणे अशक्यप्राय झाले होते. त्याला कोणत्याही सामाजिक, कौटुंबिक कार्यक्रमात सहभाग घेता येत नव्हता.
कसे केले उपचार?
या विकारावर पारंपरिक पद्धतीने पोटावर छेद घेऊन शस्त्रक्रिया करावी लागत होती. हिलिंग हँड्स क्लिनिकचे कोलोरेक्टल सर्जन डॉ. आश्विन पोरवाल यांनी विकसित केलेल्या ‘टीआरआरपीसीएस’ (ट्रान्सएनल रेक्टल रीसेकंक्शन फॉर प्रोलॅप्स बाय सर्कुलर स्टेपलर) शस्त्रक्रियेच्या माध्यमातून उपचार करण्यात आले. कोणतीही दाताची शस्त्रक्रिया करताना रुग्णाला जागेवरच भूल देऊन ती केली जाते, त्याच पद्धतीने ही शस्त्रक्रिया केली.
ही शस्त्रक्रिया करताना रुग्णाच्या शरीरावर कोणताही छेद घेतला नाही. त्यामुळे रुग्णाला भूल देणेही सोपे गेले. काही रुग्णांमध्ये ही शस्त्रक्रिया सकाळी करून दुपारनंतर रुग्णाला घरीही सोडता येते. या रुग्णावर ‘पुडेंडल ब्लॉक’ म्हणजे जागच्या जागी भूल देऊन ही शस्त्रक्रिया करता आली. शस्त्रक्रिया केल्या दिवसापासून त्याचे पोट साफ हाेण्यास तास लागायचा ताे वेळ फक्त सात ते आठ मिनिटांवर आला. तसेच लघवी करणे ही एकदम सोपे गेले. - डॉ. आश्विन पोरवाल, कोलोरेक्टल सर्जन, हिलिंह हँड्स क्लिनिक