सभेअभावी विकासकामे रखडणे हे दुर्दैव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:14 AM2021-08-13T04:14:49+5:302021-08-13T04:14:49+5:30
दौड : येथील नगरपरिषदेसाठी नियोजन मंडळाच्या माध्यमातून सुमारे साडेसोळा कोटी रुपये उपलब्ध आहे. परंतु केवळ सर्व साधारणसभा होत नसल्याने ...
दौड : येथील नगरपरिषदेसाठी नियोजन मंडळाच्या माध्यमातून सुमारे साडेसोळा कोटी रुपये उपलब्ध आहे. परंतु केवळ सर्व साधारणसभा होत नसल्याने विकास कामांचे ठराव रखडलेले आहे, ही दुर्दैवाची बाब आहे. जनतेच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली करण्यासाठी राजकारणाचा वापर करू नये, असे मत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी व्यक्त केले.
दौंड नगर परिषदेच्या परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस , शिवसेना युतीचे नगरसेवक तसेच सत्ताधारी नागरिक हित संरक्षण मंडळाच्या दोन नगरसेवकांनी काम बंद आंदोलन सुरू केले. दरम्यान आंदोलन स्थळी रमेश थोरात यांनी आंदोलकांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
रमेश थोरात म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियोजन मंडळातून दौडच्या विकासासाठी साडेसोळा कोटी रुपये मंजुर केले. हा निधी मंजूर करत असताना नगरपरिषदेत सत्ता कोणाची आहे. याचा त्यांनी कधीही विचार केला नाही. त्यामुळे गावाच्या विकासासाठी कोणीही राजकारण करू नये. नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा तसेच अन्य काही सभा घेणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यामुळे सभा घेण्यात टाळाटाळ करून कायद्याची पायमल्ली करु नये. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश सरचिटणीस वैशाली नागवडे यांनीही आंदोलकांची भेट घेतली.
अजित पवारांकडून निधी आला म्हणून विरोध
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साडेसोळा कोटी रुपयांचा निधी नियोजन मंडळातून दिला. त्यामुळे या निधीतून विकास कामे होऊ नये म्हणून विरोध सुरू केला आहे. दरम्यान नगरपरिषदेच्या निवडणूका सहा महिन्यांवर आहे. परिणामी आम्हाला विकासकामांचे श्रेय मिळू नये म्हणून हे राजकारण सुरु आहे, असा आरोप नगरसेवक इंद्रजित जगदाळे यांनी केला आहे.
१२ दौंड
आंदोलक नगरसेवकांशी चर्चा करताना रमेश थोरात व इतर.