राजमाता अहिल्यादेवींसारख्या आदर्श व्यक्तिमत्त्वांना जातीमध्ये विभागणे दुर्दैवी : शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:12 AM2021-02-14T04:12:26+5:302021-02-14T04:12:26+5:30
मार्तंडदेव संस्थानच्या वतीने जेजुरीगडावर पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा १२ फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आला आहे. त्याचबरोबर गड पायथ्यालगतच्या आद्य क्रांतिवीर ...
मार्तंडदेव संस्थानच्या वतीने जेजुरीगडावर पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा १२ फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आला आहे. त्याचबरोबर गड पायथ्यालगतच्या आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्यांच्या लोकार्पण प्रसंगी पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार छत्रपती संभाजी राजे होते. होळकर संस्थानचे युवराज यशवंतराजे प्रमुख पाहुणे होते.
पवार म्हणाले, अहिल्यादेवी आजच्या पिढीच्या स्त्री शक्तीच्या प्रतीक आहेत. त्यांनी सत्तेचा वापर समाजाच्या उन्नतीसाठी केला. त्यांच्याच आदर्शानुसार आपण घेतलेला ५० टक्के महिलांचे आरक्षण आज आपण पाहत आहोत. देश, समाज पुढे न्यायचा असेल तर महिलांना सहभागी करून घ्यायलाच हवे. इंग्रजांशी सर्वप्रथम संघर्ष करून भारताच्या इतिहासात अजरामर झालेल्या आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक हे ही व्यक्तिमत्व समाज सुधारणेसाठी प्रेरक होते.
छत्रपती संभाजीराजे म्हणाले, अहिल्यादेवी यांनी बहुजनांची सेवा केली. बहुजनांच्या देवी-देवतांच्या मंदिरांचा तसेच तीर्थक्षेत्रांचा जीर्णोद्धार केला. यशवंतराजे म्हणाले एका महान राजमातेच्या वंशात माझा जन्म झाला याचा मला अभिमान आहे.
पुरंदरचे आमदार संजय जगताप म्हणाले, शुक्रवारी घडलेले प्रकरण हे पुरंदरसाठी अत्यंत लाजिरवाणे असून त्याचा निषेधच करायला हवा देशभरातील भाविक येथे समाधान मिळवण्यासाठी येतो, इथे कोणीही राजकारण करण्यासाठी येत नाही. मात्र राजमातेच्या पुतळ्याचे राजकारण अत्यंत दुर्दैवी आहे.
यावेळी माजी मंत्री महादेव जानकर, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांचे ही भाषण झाले. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार रोहित पवार, अशोक पवार, देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त प्रसाद शिंदे, जेजुरीच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे, उपनगराध्यक्ष गणेश निकुडे, माजी नगराध्यक्ष दिलीप बारभाई, माजी आमदार अशोक टेकवडे, संभाजी झेंडे, सुदाम इंगळे, डॉ. दिगंबर दुर्गाडे, माणिक झेंडे, प्रदीप पोमन, संदीप चिकणे आदी उपस्थित होते.
देवसंस्थानचे विश्वस्त संदीप जगताप व पंकज निकुडे यांनी स्वागत केले. शिवराज झगडे यांनी सूत्रसंचालन केले. विश्वस्त राजकुमार लोढा यांनी आभार मानले. मार्तंड देव संस्थानचे विश्वस्त तुषार सहाणे, ॲड. अशोक संकपाळ यांनी संयोजन केले. जेजुरी गडावरील पुतळ्याचे अनावरण व्यासपीठावरूनच रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने करण्यात आले.