स्वतंत्र संकुलासाठी याचना करावी लागणे दुर्दैवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:16 AM2020-12-30T04:16:14+5:302020-12-30T04:16:14+5:30
पुणे : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. यासाठी प्रयत्न केले जात असताना सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाकडे मराठीसाठी स्वतंत्र संकुल ...
पुणे : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. यासाठी प्रयत्न केले जात असताना सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाकडे मराठीसाठी स्वतंत्र संकुल मिळावे, अशी मागणी करावी लागते. हे दुर्दैवी आहे. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने मराठी विषयीचा आकस दूर करून मराठी विभागाला स्वतंत्र संकुलाचा दर्जा द्यावा, अशी मागणी विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळातील प्राध्यापकांकडून केली जात आहे.
पुणे विद्यापीठाच्या स्थापनेच्या मुळ उद्देशाचा सर्वांनाच विसर पडला असून तब्बल ७१ वर्षांपासून विद्यापीठाने मराठी विभागाकडे कायम दूर्लक्ष केले,असा आरोप वेळोवेळी विविध विद्यार्थी संघटना व मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या संघटनांकडून केला. परंतु, त्याचा कोणताही परिणाम विद्यपीठ प्रशासनावर झाला नाही. विद्यापीठातील मराठी विभागाला स्वतंत्र संकुलाचा दर्जा देण्याऐवजी या विभागाचा समावेश स्कूल ऑफ इंडियन लॅग्वेजमध्ये केला. मात्र, महाराष्ट्रात राजभाषा म्हणून मान्यता मिळालेल्या मराठी भाषेकडे विद्यापीठ लक्ष देणार आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
--
मराठी भाषेचे संवर्धन आणि संशोधनासाठी विद्यापीठात
स्वतंत्र संकुल झाले पाहिजे. ही मागणी रास्त आहे. याबरोबरच मराठी भाषा ही सर्व विद्याशाखांमध्ये अनिवार्य व्हावी, यासाठी विद्यापीठातर्फे गेल्या वर्षी स्थापन केलेल्या समितीची अद्याप एकही बैठक झाली नाही,हेही एक वास्तव आहे. ही अनास्थाही दूर झाली पाहिजे. मराठीचा एक माध्यम भाषा म्हणून विद्यापीठातील सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले पाहिजे.
- डॉ. शिरीष लांडगे, अध्यक्ष, मराठी अभ्यास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
--
मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी स्थापन झालेल्या विद्यापीठात मराठीसाठी स्वतंत्र संकुलाची मागणी करावी लागते,हेच आपले दूर्भाग्य आहे. मराठी विषय अनिवार्य व्हावा याबाबत केवळ चर्चा होते. वर्षानुवर्षेभाषा भवन तयार होत नाही. परंतु, मराठीसाठी काम करण्याची विद्यापीठाची प्रशासनाची इच्छाशक्ती पाहिजे.
- डॉ. संदीप सांगळे, सदस्य, मराठी अभ्यास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ