भाजपच्या आदेशानेच माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले; आमदार रवींद्र धंगेकरांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 11:52 AM2024-01-31T11:52:50+5:302024-01-31T11:55:01+5:30
आशानगर येथील पालिकेच्या नवीन पाण्याच्या टाकीचे उद्घाटन केल्यावरून आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या पार्श्वभूमीवर, धंगेकर यांनी भूमिका मांडली....
पुणे : आशानगर येथील पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनावेळी जे बोललो तो कार्यकर्त्यांचा संताप होता. भाजपच्या आदेशानेच माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. मला दोन-तीन महिने जेलमध्ये घालण्याचा पोलिसांचा प्लॅन आहे, अशी टीका कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली. आशानगर येथील पालिकेच्या नवीन पाण्याच्या टाकीचे उद्घाटन केल्यावरून आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या पार्श्वभूमीवर, धंगेकर यांनी भूमिका मांडली.
भाजपच्या आदेशाने माझ्यावर खोटे कलम लावले आहे. गेल्या आठ महिन्यांपासून मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनासाठी सर्वपक्षीय नेत्यांना बोलावण्याचा ठराव झाला होता, तरी जगताप यांनी परवानगी न घेता कार्यक्रम घेतला. कॉंग्रेसने केलेल्या कामाचे श्रेय भाजप घेत असताना संबंधित कार्यक्रमाला विरोधी पक्षाला बोलावले नाही, याकडे आमदार रवींद्र धंगेकर यांनी यावेळी लक्ष वेधले.
हा कार्यक्रम भाजपमय होता. माझ्यावर ३५३ कलम लावणे चुकीचे आहे. मी लोकप्रतिनिधी असल्याने मला अडवू शकत नाहीत. गुन्हा दाखल झाल्याबद्दल मला खेद वाटत नाही, कारण मी लोकांसाठी लढणारा, लोकांचे प्रश्न सोडवणारा कार्यकर्ता आहे. सामान्य लोक हीच माझी ताकद आहे. पोलिसांनी भाजपच्या सांगण्यावरून कलम लावले आहे. याआधी गुन्हा दाखल झाला, तेव्हा मी आमदार झालो. आता परत गुन्हा दाखल झाला आहे, पुढे बघू काय होते, असे धंगेकर यांनी सांगितले.