पराभवाच्या भीतीनेच शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना आणली; निलेश लंकेंची युतीवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 02:58 PM2024-11-18T14:58:37+5:302024-11-18T14:59:51+5:30
योजना २० तारखेला होणाऱ्या मतदानासाठी असून हे सरकार बहिणींना फसवणार, आघाडीचे सरकार आल्यास तीन हजार रुपये देणार
पुणे : लोकसभेला महायुतीला मतदारांनी चांगलाच दणका दिल्याने विधानसभेत पराभवाच्या भीतीनेच शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना आणली. मात्र ही योजना २० तारखेला होणाऱ्या मतदानासाठी असून हे सरकार बहिणींना फसवणार आहे. मात्र, आमचे महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर आम्ही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देणार आहोत असे मत खासदार नीलेश लंके यांनी वडगावशेरीतील सभेच व्यक्त केले.
वडगावशेरी मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारासाठी आयोजित परिवर्तन महासभेत अहिल्यादेवीनगरचे खासदार नीलेश लंके यांनी भाषण केले.
नीलेश लंके म्हणाले, या परिसराचे परिवर्तन बापूसाहेब पठारे यांनी केले. विकास केला. संकट समयी आधाराचे केंद्र बापूसाहेब पठारे यांनी निर्माण केले. नगरचे नागरिक येथे मोठ्या प्रमाणावर मतदार आहेत. ते तुतारी लाच मतदान करतील. खरे कार्यसम्राट बापूसाहेब आहेत, सामान्यांचे ते आधारवड आहेत. शरद पवार यांना झालेल्या त्रासाची भरपाई केली पाहिजे. सत्तारूढ लोक लबाड आहेत, महाविकास आघाडी सत्तेवर येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. पुढे शेतकरी, महिला, बेरोजगार वर्गासाठी काम करु.
बापूसाहेब पठारे म्हणाले, प्रतिस्पर्धी उमेदवार खोटारडा आहे. त्यांनी १० कोटींची कामे दाखवावी, १५०० कोटीची भाषा करू नये. पवार साहेब हे आमचे दैवत आहे. टँकर वापरल्याचा आरोप करणाऱ्यांनी पाण्याचा कधीच प्रश्न सोडवला नाही. आपण जिंकणार आहोत. आणि चांगले परिवर्तन या मतदारसंघात घडवणार आहोत.
गेल्या दहा वर्षांत मतदारसंघाची प्रचंड पीछेहाट झाली आहे. माझ्या काळात खराडी, विमाननगर, येरवडा येथे मोठ्या आयटी कंपन्या आणल्या मात्र मतदारसंघातील समस्यांचा वाढता त्रास अन् जीवघेणी वाहतूककोंडीत अडकणाऱ्या नोकरदार व कंपन्या चालकही त्रस्त असल्याने अनेक कंपन्या इतर राज्यात गेल्या आहेत. आपल्या हक्काचे रोजगार या नाकर्त्यांना आमदारांमुळे परराज्यात गेला आहे. पुन्हा कंपन्या आपल्या भागात आणण्यासाठी प्रयत्न करणार. -बापूसाहेब पठारे, उमेदवार महाविकास आघाडी