'उपसरपंचपदी' निवड झालेल्या महिलेचा सत्कार करणे पडले महागात; शिक्रापूर पोलिसांत गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 09:51 PM2020-08-18T21:51:50+5:302020-08-18T21:53:25+5:30
सोशल मीडियावर सत्काराचा फोटो पोस्ट केल्यावर पोलिसांची कारवाई
शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक पार पडल्यानंतर ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरांमध्ये पस्तीस ते चाळीसहून अधिक लोकांनी एकत्र येऊन नवनिर्वाचित उपसरपंच महिला रोहिणी गिलबिले यांचा सत्कार केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या चालू पाच वर्षांच्या काळामध्ये अनेकांना सरपंच, उपसरपंच पदाची संधी देण्यात आली. सोमवारी(दि.१७) शिक्रापूर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदाची निवडणूक पार पडली. यावेळी सत्ताधारी गटाच्या रोहिणी दत्तात्रय गिलबिले यांची उपसरपंचपदी निवड झाली. निवड झाल्यानंतर अनेकांनी ग्रामपंचायत येथे गिलबिले यांचा सन्मान केला.
त्यानंतर शिक्रापूर गावचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरामध्ये सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील अनेक पदाधिकारी, राजकीय नेते यांसह अनेकांनी तेथे गर्दी केली. शासनाचे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जमावबंदी असताना देखील लोकांची गर्दी करून नवनिर्वाचित उपसरपंच रोहिणी गिलबिले यांचा सत्कार केला.
याबाबतचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलीस नाईक तेजस लक्ष्मण रासकर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार , रेखा बांदल, शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता राऊत, उपसरपंच रोहिणी गिलबिले, रामभाऊ सासवडे,रेखा बांदल,जयश्री भुजबळ, जयश्री दोरगे, भगवान वाबळे, दत्तात्रय गिलबिले, राजाभाऊ मांढरे, दत्तात्रय राऊत, जनार्दन दोरगे, दिलीप वाबळे, अण्णा हजारे, नाना गिलबिले, आकाश गिलबिल व इतर जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश चव्हाण करत आहे.