पुण्यात पोलिस निरीक्षकांना वाढदिवस साजरा करणे पडले महागात; स्वतः पॉझिटिव्ह; भेटलेले २०० जण अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 08:17 PM2020-08-29T20:17:50+5:302020-08-29T20:19:59+5:30
कोरोना काळातही वाढदिवस असल्याने त्यांना भेटून शुभेच्छा देण्यासाठी हद्दीतील मान्यवर तसेच मित्रमंडळींची रांग लागली होती.
पुणे : गेल्याच महिन्यात साहेबांनी या पोलिस ठाण्याचा चार्ज घेतला होता. त्यामुळे कोरोना काळातही वाढदिवस असल्याने त्यांना भेटून शुभेच्छा देण्यासाठी हद्दीतील मान्यवर तसेच साहेबांच्या मित्रमंडळींची देखील रिघ लागली होती. यावेळी भेटवस्तू, केक व पेढा भरवतानाचे फोटो मोठ्या प्रमाणावर समाज माध्यमांवर प्रसारीत झाले होते. शुक्रवारी सध्याकाळी मात्र साहेबांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बुधवारी दिवसभरात तसेच या आठवड्यात त्यांना भेटलेल्या नागरीक व पोलिसांनी स्वत:ची चाचणी करून घेणे गरजेची असल्याचे मत पोलिस वर्तुळातून व्यक्त होत आहे.वाढदिवशी साहेबांची भेट घेणार्या मित्र व आप्तेष्ट यांची संख्या सुमारे २०० पेक्षा जास्त असल्याने चिंतेत भर पडली आहे.
पुणे शहरातील एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना वाढदिवसाच्या दिवशी इतरांची भेट घेणे महागात पडले आहे.त्यांना कोरोनाची लागण झाली असून गुन्हे निरीक्षक देखील आधीपासूनच कोरोनाग्रस्त असल्याने सदर पोलिस ठाणे वरिष्ठ अधिकारी विना झाले आहे. पश्चिम भागातील या पोलिस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकांचा बुधवारी वाढदिवस होता.
वास्तविक सध्याच्या लॉक डाउन च्या काळात पोलिसांसह सर्वच नागरीकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. पण ज्यांनी कायदा व व्यवस्था सांभाळायची आहे त्यांनीच असे चुकीचे वागल्यास व नागरीकानी त्यांचे अनुकरण केल्यास पुढील काळात कोरोंनाशी लढा देणे अवघड होईल. विशेष म्हणजे शेजारील पोलिस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकांना देखील कोरोंनाची लागण झाली असून ते देखील दीनानाथ रुग्णालयात शनिवार पासून उपचार घेत आहेत. त्यामुळे आता आयुक्तालयाला दोन्ही पोलिस ठाण्यासाठी वरिष्ठ अधिकार्यांची तात्पुरती नियुक्ती करावी लागणार आहे.
गुन्हे निरीक्षक महिनाभर क्वारंटाईन याच पोलिस ठाण्याच्या गुन्हे निरीक्षकांना महिनाभर पूर्वी कोरोंनाने गाठले होते. काही दिवसांनी ते उपचार घेऊन कोरोनमुक्त देखील झाले होते. पण ते रुजू होणार तोच त्यांच्या मुलीला लागण झाल्याने त्यांनी पुन्हा चाचणी केली असता त्यांना पुन्हा लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पुन्हा ते आता उपचार घेत आहेत.
या पोलिस ठाण्यातील दोन्ही वरिष्ठ अधिकारी कोविडग्रस्त असल्याने एका सहायक निरीक्षकांना तात्पुरता पदभार दिला आहे. लवकरच या ठिकाणी दुसरे निरीक्षकांना नेमून त्यांच्याकडे तात्पुरता पदभार सोपविण्याची प्रक्रिया चालू आहे.