दानशूर लोकांच्या मदतीमुळेच कोरोना रुग्णांची धावपळ वाचली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:11 AM2021-05-22T04:11:17+5:302021-05-22T04:11:17+5:30
मंचर : कोरोनाच्या रुग्णांवर तालुक्यातच उपचार होऊन सर्व सुविधा मोफत उपलब्ध करण्यासाठी शासनाबरोबरच तालुक्यातील संस्था व दानशूर व्यक्तींनी पुढाकार ...
मंचर : कोरोनाच्या रुग्णांवर तालुक्यातच उपचार होऊन सर्व सुविधा मोफत उपलब्ध करण्यासाठी शासनाबरोबरच तालुक्यातील संस्था व दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन जे काम केले आहे, ते कौतुकास्पद असून, पुढील काळात येणाऱ्या तिसऱ्या कोरोना लाटेशी लढण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील नागरिकांनी केलेल्या मदतीमुळे नक्कीच कोरोना रुग्णांना फायदा होईल, असे मत शरद सहकारी बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी व्हेंटिलेटर लोकार्पण कार्यक्रमात मांडले.
मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात १३ व्हेंटिलेटर लोकार्पण सोहळा शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रांत सारंग कोडलकर, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंबादास देवमाणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, उपसरपंच युवराज बाणखेले व दानशूर व्यक्ती उपस्थित होत्या. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तालुक्यातील अनेक संस्था व दानशूर व्यक्तींनी कोरोनाच्या लढाईत प्रशासनाला साथ देण्यासाठी वैद्यकीय सेवेसाठी अत्यावश्यक गरजा तत्काळ उपलब्ध करून दिल्या आहेत.
आज उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे झालेल्या कार्यक्रमात भरत तुकाराम भोर यांच्याकडून दोन व्हेंटिलेटर, मोरडे फुड्स हर्षल मोरडे यांच्याकडून ३ व्हेंटिलेटर, कमल राज असोसिएट मोहन थोरात, कमलेश गांधी यांच्याकडून १ व्हेंटिलेटर, साईनाथ नागरी पतसंस्था मंचर यांच्याकडून एक व्हेंटिलेटर, कुलस्वामिनी क्रेडिट सोसायटी एक व्हेंटिलेटर, गणेश इंजिनियर्स सावता वाघमारे नारोडी यांच्याकडून एक व्हेंटिलेटर. प्रत्येकी ५ लाख ८४ हजार ३६० रुपये किमतीचे व्हेंटिलेटर, तर २ लाख ८४ हजार ३६० रुपये किमतीचे प्रत्येकी एक व्हेंटिलेटर पराग सहकारी पतसंस्था मंचर १, पराग मिल्क मंचर १, अलायन्स इन्फ्रा, कमलेश शिंदे १, राम ग्रामीण पतसंस्था, घोडेगाव १, श्रीराम नागरी सह. पतसंस्था, नवी मुंबई १, कमल राज असोसिएट मोहन थोरात, कमलेश गांधी यांच्याकडून १ व्हेंटिलेटर व खडकी ग्रामस्थ यांच्याकडून एक व्हेंटिलेटर असे तेरा व्हेंटिलेटर लोकार्पण करण्यात आले. यामुळे तालुक्यातील रुग्णांना व्हेंटिलेटर बेडसाठी शहराचा रस्ता धरावा लागणार नाही. तालुक्यातच आता रुग्णांना मोफत व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होऊन उपचार होणार आहेत. पुढील काही दिवसांत अजून ३५ व्हेंटिलेटर बेड व अन्य वैद्यकीय साहित्य दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्यात उपलब्ध होणार असल्याची माहिती शहा यांनी दिली.