रशियामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाचे पार्थिव भारतात आणणे झाले शक्य; सुप्रिया सुळेंच्या प्रयत्नांना यश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 09:12 PM2021-05-01T21:12:59+5:302021-05-01T21:18:47+5:30

इंदापूर तालुक्यातील एका विद्यार्थ्याचे रशियात कर्करोगामुळे निधन झाले होते.....

It was possible to bring the body of a young man who died in Russia to India; Success to Supriya Sule's efforts | रशियामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाचे पार्थिव भारतात आणणे झाले शक्य; सुप्रिया सुळेंच्या प्रयत्नांना यश

रशियामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाचे पार्थिव भारतात आणणे झाले शक्य; सुप्रिया सुळेंच्या प्रयत्नांना यश

googlenewsNext
ठळक मुद्देइंदापूर तालुक्यातील पिंपरी बुद्रुकमध्ये झाले अंत्यसंस्कार

बारामती : रशियामध्ये निधन झालेल्या इंदापूर तालुक्यातील एका विद्यार्थ्याचे पार्थिव भारतात आणणे खासदार सुप्रिया सुळे यांच्यामुळे शक्य झाले. वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या या तरुणाने २१ एप्रिल रोजी कर्करोगामुळे निधन झाले.

तन्मय आबासाहेब बोडके (वय २२, रा. पिंपरी बुद्रुक, ता. इंदापूर) असे या विद्यार्थ्यचे नाव असून तो रशियामध्ये एमबीबीएस च्या तिसऱ्या वर्षाला होता. रशियामधील निझनी नोवागोर्ड विद्यापीठात तो शिकत होता. अचानक वजन वाढत जाऊन त्याला चालणेही मुश्किल झाले. त्यामुळे रुग्णालयात तपासणी केली असता त्याला कर्करोग झाल्याचे लक्षात आले. त्यासाठी शस्त्रक्रिया चालू असताना रक्तदाब कमी होऊन त्याचे निधन झाले, अशी माहिती तन्मय याचे निकटवर्तीय श्रीकांत बोडके यांनी दिली. 

भारतात सध्या कोरोनाच्या साथीने थैमान घातले असून महाराष्ट्रात तर अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच प्रकारच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत परदेशात निधन झालेल्या तन्मयचे पार्थिव विमानाने भारतात आणून त्याच्या मूळ गावापर्यंत पोहोचवणे मोठे जिकिरीचे होते. ही बाब श्रीकांत बोडके यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या लक्षात आणून दिली. त्यानुसार सुळे यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर, रशियाचा भारतातील दूतावास, तेथील निझनी विद्यापीठ प्रशासन यांच्याशी सातत्याने पाठपुरावा करत तन्मय याचे पार्थिव भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले. 

या प्रयत्नांना अपेक्षित यश येऊन अखेर २९ एप्रिल रोजी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याचा मृतदेह आणण्यात आला. दरम्यानच्या कालावधीत सुप्रिया सुळे या सातत्याने बोडके कुटुंबियांच्या संपर्कात होत्या. त्यांना सतत आधार देत इकडे दोन्ही देशांच्या प्रशासनाशीही त्या पाठपुरावा करत होत्या. अखेर मृतदेह मुंबईत दाखल झाल्यानंतर सुळे यांनी परराष्ट्र मंत्री जयशंकर, रशियन दूतावास आणि अन्य शासकीय यंत्रणांचे आभार मानले.  
तन्मयचे पार्थिव मुंबईहुन रुग्णवाहिकेतून इंदापूर तालुक्यात पिंपरी बुद्रुक या त्याच्या मूळ गावी आणल्यानंतर काल (दि. ३०) सकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंत अडचणीच्या प्रसंगी खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या या मदतीमुळे तन्मयचे पार्थिव आणता आले. त्यासाठी संपूर्ण बोडके कुटूंबीय आणि निकटवर्तीय सुळे यांचे आभारी आहोत, अशा भावना श्रीकांत बोडके यांनी व्यक्त केल्या.

Web Title: It was possible to bring the body of a young man who died in Russia to India; Success to Supriya Sule's efforts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.