कुटुंबालाच संपविण्याच्या तयारीने ‘तो’ आला होता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 06:08 AM2019-04-18T06:08:00+5:302019-04-18T06:08:06+5:30
सदाशिव पेठेत तरुणावर अॅसिड टाकून स्वत:वर गोळीबार करुन आत्महत्या केलेला सिद्धराम विजय कलशेट्टी हा त्या संपूर्ण कुटुंबाला संपविण्याच्या इराद्याने आल्याचा पोलिसांना संशय आहे़
पुणे : सदाशिव पेठेत तरुणावर अॅसिड टाकून स्वत:वर गोळीबार करुन आत्महत्या केलेला सिद्धराम विजय कलशेट्टी हा त्या संपूर्ण कुटुंबाला संपविण्याच्या इराद्याने आल्याचा पोलिसांना संशय आहे़ त्याच्याकडील बॅगेत पंच, २ कोयते आणि २ चाकू आढळले आहेत़ गावठी पिस्तुलही त्याच्याकडे होते़ त्याने या पिस्तुलातूनच रोहित थोरातसह पोलिसांवर दोन गोळ्या झाडल्या होत्या़ त्यानंतर स्वत:च्या कपाळावर मधोमध गोळी झाडून घेतली होती़ त्याच्या खिशातही काही राऊंड सापडले आहेत़
कलशेट्टी याने सदाशिव पेठेत मैत्रिणीबरोबर बोलत उभ्या असलेल्या रोहित थोरात याच्या अंगावर अॅसिड टाकले व तो शेजारील आनंदी निवास इमारतीत लपून बसला़ त्याला शोधण्यासाठी आलेल्या पोलिसांवर त्याने दोन गोळ्या झाडल्या व त्यानंतर इमारतीवरुन डक्टमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली होती़ मंगळवारी रात्री उशीरा हे थरारनाट्य घडले.
पोलिसांनी सांगितले, कलशेट्टी हा अक्कलकोट येथील तेलाचा व्यापारी होता़ रोहित व त्याची आई अक्कलकोटला दर्शनासाठी गेले असताना त्यांची ओळख झाली होती़ त्यातून रोहितच्या आईबरोबर त्याची फेसबुकवर मैत्री होती़ त्याने काही अश्लिल मेसेज टाकल्यामुळे रोहितच्या आईने त्याच्याविरुद्ध आॅक्टोबर २०१८ मध्ये विनयभंगाची फिर्याद दिली होती़ पोलिसांनी अटक केल्यावर तो जामीनावर सुटला होता़
मंगळवारी रात्री कलशेट्टी संपूर्ण तयारीनिशी आला होता़ तो मोठे हत्याकांड करण्याच्या इराद्याने आल्याचा पोलिसांना संशय आहे़ मात्र, दारातच रोहित दिसल्याने त्याने त्याच्या अंगावर अॅसिड टाकले व त्याच्यावर गोळीबार केला़ सुदैवाने गोळी त्याच्या अंगाला चाटून गेली़ रोहितच्या प्रकृतीत सुधारणा आहे़
अक्कलकोट येथील मंदिराजवळ कलशेट्टीचा हार व तेल विक्रीचा स्टॉल आहे़ रोहितच्या वडिलांचे २००९ मध्ये निधन
झाले़ त्याची आई ज्योतिषविशारद आहे़ अक्कलकोटला गेले असताना त्यांची ओळख झाली होती़ कलशेट्टीलाही ज्योतिषशास्त्रात रुची असल्याने त्यांचे फेसबुक, व्हॉटसअॅपवर बोलणे होत होते़ कलशेट्टीने ओळखीचा वेगळा अर्थ घेतल्याने रोहितच्या आईने त्याच्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार दिली होती़ पोलिसांनी अटकही केली होती़
>तीन दिवसांपूर्वी डुकरावर हल्ला
कलशेट्टीने तीन दिवसांपूर्वी अक्कलकोटमध्ये डुकरावर अॅसिड हल्ला केला होता. मग त्याला कोणी कसे रोखले नाही,इतक्या सर्व शस्त्रानिशी तो आला होता, तर त्याचा आणखी काही जणांवर सूड उगवायचा हेतू होता का ? असा सवाल उपस्थित झाला आहे.