Winter Session Maharashtra: राज्यात यंदा थंडी वाढणार; आता झाली हिवाळ्याची सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 09:13 AM2022-12-02T09:13:39+5:302022-12-02T09:14:06+5:30
उत्तर पश्चिम भारताच्या बहुतांश भागात तसेच ईशान्येकडील राज्यांत मात्र, थंडी कमी राहण्याची शक्यता
पुणे : यंदाच्या हिवाळ्याची सुरुवात भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या लेखी गुरुवारपासून (दि. १) झाली आहे. फेब्रुवारीपर्यंत असणाऱ्या हंगामात दक्षिणेकडील राज्यांत तसेच मध्य भारत व उत्तर पश्चिम भारताच्या काही भागांत किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. त्याचाच अर्थ यंदा थंडी जास्त असेल. उत्तर पश्चिम भारताच्या बहुतांश भागात तसेच ईशान्येकडील राज्यांत मात्र, थंडी कमी राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गुरुवारी राज्यात पुन्हा थंडीचा प्रभाव वाढला असून सर्वांत कमी तापमान औरंगाबाद येथे १०.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. पुण्यातही पुन्हा थंडी वाढली असून शहरात तापमानाचा पारा ११.९ अंश सेल्सिअसपर्यंत उतरला.
हवामान विभागाने सबंध हिवाळ्यासाठी चार महिन्यांचा अंदाज गुरुवारी जारी केला. त्यानुसार उत्तर पश्चिम, पूर्व व उत्तर पूर्व भारताचा बहुतांश भाग तसेच मध्य भारताच्या अनेक भागांत कमाल तापमान हे सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. दक्षिणेकडील राज्ये व मध्य भारताच्या काही भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे तर डिसेंबरमध्ये दक्षिणेकडील राज्यांत पडणारा पाऊसही सरासरीइतका पडण्याचा अंदाज आहे. तर देशाच्या अन्य भागांत याच महिन्यात पडणारा सरासरीपेक्षा कमी असेल.
राज्यातील प्रमुख शहरांतील किमान तापमान
कोल्हापूर १६.८, महाबळेश्वर १२.८, मालेगाव १६.४, नाशिक १३, सांगली १५.२, सातारा १६.६, सोलापूर १५.१, मुंबई २२.५, अलिबाग १८.८, रत्नागिरी २०.३, डहाणू १९.६, उस्मानाबाद १५.२, परभणी १२.३, नांदेड १३., अकोला १४.२, अमरावती १३.७, बुलढाणा १४, चंद्रपूर १४.६, गोंदिया १२.४, नागपूर १३.२, वाशिम १४, वर्धा १३.८.
''थंडीचा प्रभाव शुक्रवारीही कायम राहील. त्यानंतर बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात आर्द्रतेचे प्रमाण वाढून पुन्हा थंडी कमी होईल. कमाल तापमानही वाढेल. ही स्थिती पुढील चार ते पाच दिवस राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुन्हा आर्द्रतेचे प्रमाण कमी होऊन थंडी वाढेल. - डॉ. अनुपम काश्यपी, हवामान अंदाज विभागप्रमुख''