दहावी - बारावीत क्रीडा गुण मिळवणे होणार कठीण : शिक्षण विभागाने बदलला नियम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 08:58 PM2019-01-02T20:58:12+5:302019-01-02T20:59:33+5:30
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या क्रीडा गुणांच्या सवलतीमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून (२०१८-१९) काही बदल करण्यात आले आहेत.
पुणे : दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या क्रीडा गुणांच्या सवलतीमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून (२०१८-१९) काही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांनी इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंत विविध खेळप्रकारांमध्ये मिळवलेल्या प्राविण्याचा विचार होणार आहे, मात्र त्यांनी इयत्ता दहावी किंवा बारावीमध्ये त्या खेळप्रकारामध्ये सहभाग घेतला असणे आवश्यक असणार असल्याचे राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रविष्ठ होणारे खेळाडू विद्यार्थी तसेच एनसीसी, स्काऊट गाइडमधील विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबतची सुधारीत कार्यपध्दती राज्य मंडळाकडून जाहीर करण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार जाहीर करण्यात आलेल्या ११ खेळप्रकारांमध्ये प्राविण्य मिळवलेले असल्यास त्याचाच विचार केला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी इयत्ता ६ वी ते १० पर्यंत जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभाग घेतला असल्यास शासनाच्या परिशिष्ट ६ मधील तरतुदीनुसार त्या विद्यार्थ्यांना ५ ते २५ पर्यंत गुण दिले जाणार आहेत. मात्र त्यानंतर इयत्ता दहावीमध्ये असताना त्या विद्यार्थ्यांने संबंधित क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेणे आवश्यक आहे. इयत्ता १२ वीमध्ये गुणांची सवलत मिळविताना त्याने बारावीमध्ये क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेणे आवश्यक आहे अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.
खेळाडू कोणत्याही जिल्हयातून खेळला असला तरी विद्यार्थी ज्या ठिकाणी शिकत असेल त्या जिल्हयाच्या क्रीडा अधिकाऱ्यांनी त्यास प्रमाणित करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याने एकापेक्षा अधिक क्रीडा स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवले असले तरी त्याने ज्या उच्चतम असणाऱ्या क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला त्या एकाच सवलतीचे गुण त्याला दिले जातील. जिल्हा क्रीडा अधिकारी त्यांना शाळांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करून ३० एप्रिल पूर्वी ते संबंधित विभागीय मंडळास शिफारशींसह प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.