तो’ बॉम्ब कवलापुरातच निकामी करणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2016 12:14 AM2016-03-12T00:14:48+5:302016-03-12T00:20:53+5:30
लष्कराच्या अधिकाऱ्यांची प्रतीक्षा : चोवीस तास शस्त्रधारी पहारा
सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथे सापडलेला लष्करातील बॉम्ब कवलापुरातच निकामी केला जाणार आहे. पण यासाठी लष्कराच्या अधिकाऱ्यांची प्रतीक्षा लागून राहिली आहे. बॉम्ब सापडून आठवड्याचा कालावधी होऊन गेला, तरी अजूनही लष्कराचे अधिकारी सांगलीत आलेले नाहीत. त्यामुळे बॉम्बच्याठिकाणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा २४ तास शस्त्रधारी पहारा ठेवला आहे.
कवलापुरातील बिसूर रस्त्यावरील सुकुमार आष्टेकर यांचे हे शेत आहे. गेल्या आठवड्यात या शेतात ट्रॅक्टरने नांगरणी सुरु होते. त्यावेळी ट्रॅक्टरच्या फाळाला एक बॉम्ब आढळून आला होता. त्यानंतर बॉम्बशोधक पथकास पाचारण केले होते. पथकाने तपासणी केल्यानंतर हा लष्करातील असल्याचे स्पष्ट झाले होते. चाळीस वर्षांपूर्वीचा हा बॉम्ब असावा, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. लष्कराच्या मदतीने हा बॉम्ब निकामी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा बॉम्ब उचलून निर्जन ठिकाणी नेण्याचे धोक्याचे होते. त्यामुळे आष्टेकर यांच्या शेतातच चार फूट खड्डा खोदून एका पोत्यात हा बॉम्ब ठेवण्यात आला आहे.
ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांनी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड व जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांच्या आदेशाने याची माहिती पुण्यातील लष्कराच्या कार्यालयात दिली होती. पण लष्कराचे अधिकारी अजूनही सांगलीत आलेले नाहीत. आष्टेकर यांच्या शेतात बॉम्ब कसा आला? याचाही उलगडा अद्याप झालेला नाही. काही वर्षापूर्वी आष्टेकर यांनी त्यांच्या विहिरीतील गाळ काढला होता. या विहिरीतच हा बॉम्ब असण्याची शक्यता आहे. गाळाबरोबर तो बाहेर आला असावा, असा अंदाज आहे. पण यासंदर्भात कोणतीही ठोस माहिती पुढे आलेली नाही. हा बॉम्ब कवलापुरातच निकामी केला जाणार आहे. पण तो कसा निकामी केला जाणार आहे, हे सांगण्यात आले नाही. (प्रतिनिधी)
पोलीस अडकले
लष्कराच्या अधिकाऱ्यांना येण्यास विलंब लागत असल्याने दोन पोलीस याठिकाणी अडकून पडले आहेत. त्यांना २४ तास पहारा द्यावा लागत आहे. भर उन्हात त्यांना बसावे लागत आहे. त्यांना हे ठिकाण सोडून कुठे न जाण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसेच या परिसरात नागरिकांना तेथे येण्यास मनाई करण्यात आली आहे. भीतीने शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात जायचेही बंद केले आहे.