संतपरंपरेला गालबोट लावाल तर ते खपवून घेतले जाणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:08 AM2021-07-02T04:08:28+5:302021-07-02T04:08:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आळंदी : यंदाही गतवर्षीप्रमाणे आषाढीवारी सोहळा बसने पंढरपूरला जाणार आहे. त्याबाबत राज्यशासनाने आदेशही जारी केला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
आळंदी : यंदाही गतवर्षीप्रमाणे आषाढीवारी सोहळा बसने पंढरपूरला जाणार आहे. त्याबाबत राज्यशासनाने आदेशही जारी केला आहे. मात्र असे असतानाही हा वारी सोहळा परंपरेनुसार पायी मार्गस्थ झाला पाहिजे, अशी मागणी करणाऱ्यांना आळंदीतील ग्रामस्थांनी खडे बोल सुनावले आहेत.
आळंदीत येऊन जर कोणी संतपरंपरेला गालबोट लावणार असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका आळंदीकर ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे मांडली आहे.
दरम्यान, यंदाची आषाढी वारी परंपरेनुसारच व्हावी, अशी मागणी ज्येष्ठ वारकरी हभप बंडातात्या कराडकर तसेच काही ठराविक वारकरी संघटना व भाजपच्या आध्यात्मिक आघाडीकडून केली जात आहे. त्यातच ज्येष्ठ वारकरी हभप बंडातात्या कराडकर यांनी हजारो व्यसनमुक्तीचे मावळे व काही वारकरी संघटनेच्या प्रतिनिधींसमवेत आळंदीत प्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे.
याविरोधात आळंदीकर ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात लेखी निवेदन दिले आहे. प्रस्थान सोहळ्याला देवस्थानचे निमंत्रित केलेल्या वारकऱ्यांचे आम्ही स्वागत करू; मात्र विरोधी भूमिका घेणाऱ्यांना आळंदीकर खपवून घेणार नाही, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.