रक्त सांडले तरी चालेल; पण जमीन देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:11 AM2021-07-30T04:11:44+5:302021-07-30T04:11:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चाकण : रक्त सांडले तरी चालेल पण रिंगरोड आणि रेल्वेसाठी इंचभर ही जमीन देणार नाही, असा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चाकण : रक्त सांडले तरी चालेल पण रिंगरोड आणि रेल्वेसाठी इंचभर ही जमीन देणार नाही, असा पवित्रा घेऊन भूसंपादनाला आपला विरोध कायम असल्याचे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी माजी खासदार तथा उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितले.
खेड तालुक्यातील बारा गावांमधील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा रिंगरोड आणि रेल्वेसाठी जमीन देण्याचा विरोध कायम असल्याचे स्व. आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या संपर्क कार्यालयात गुरुवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शासकीय अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. यावेळी माजी खासदार तथा शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, स्व. आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गोरे, जि. प. सदस्य बाबाजी काळे, सहसंपर्कप्रमुख अशोक खांडेभराड, प्रकाश वाडेकर, माजी जि. प. सदस्य किरण मांजरे यांच्यासह रिंगरोड, रेल्वे प्रकल्प अधिकारी आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
खेड तालुक्यातील खालुंब्रे, निघोजे, कुरुळी, मोई, चिंबळी, केळगाव, आळंदी, चऱ्होली, धानोरे, सोळू, मरकळ आणि गोलेगाव या गावांचा त्यात समावेश आहे. रेल्वे प्रकल्पाच्या मार्गासाठी ५० ते ८० मीटर आणि रिंगरोडसाठी सऱ्हासपणे ११० मीटर अशी एकूण ५८६ हेक्टर जमीन संपादित होणार आहे. ही सर्व गावे भामा आणि इंद्रायणी नद्यांच्या जवळ वसलेली आहेत. येथील शेतकऱ्यांना कमी प्रमाणात शेतजमिनी आहे. बऱ्यापैकी जमीन बागायत असल्यामुळे येथील शेतकरी यावर उदारनिर्वाह करतात. या दोन्ही प्रकल्पांना जमीन संपादन झाल्यास अनेक शेतकरी भूमिहीन तर काही अल्पभूधारक होणार आहेत. त्यामुळे इंचभर ही जमीन देणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. याच गावांमध्ये असलेल्या शेकडो एकर शासकीय गायरान जमिनीवर हे प्रकल्प राबविले जावेत, अशी मागणी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
रिंगरोड आणि रेल्वे प्रकल्पाला माझा विरोध नाही. मात्र शेतकऱ्यांना देशोधडीला लावून प्रकल्प उभारण्यात येणार असतील तर आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत. शेतकऱ्यांचे कमीत कमी नुकसान कसे होईल याकडे पाहून दोन्ही प्रकल्प पूर्ण करावे, असे शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले. यावेळी नितीन गोरे यांनीही शिवसेना शेतकऱ्यांच्यासोबत असल्याचे सांगितले.
फोटो - चाकण येथे रिंगरोड आणि रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी व अधिकारी बैठक.