घरगुती गणेशोत्सवावर निर्बंध लादणे चुकीचे; सरकार व प्रशासनाला पूर्ण सहकार्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 09:46 PM2020-07-11T21:46:44+5:302020-07-11T21:50:01+5:30
नागरिकांच्या श्रद्धा व भावनांशी प्रशासनाने खेळू नये, अशी आमची भूमिका आहे...
पुणे : यंदा घरगुती गणेशोत्सव साजरा करताना नागरिकांनी गणेशमूर्ती आणू नयेत अशी भूमिका प्रशासनातील काही अधिकारी मांडत असतील तर ते अत्यंत चुकीचे आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी शासन आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिलेले असताना थेट लोकांच्या घरापर्यंत जाणे अशोभनीय असून नागरिकांच्या श्रद्धा व भावनांशी खेळू नये अशी भूमिका गणेश मंडळांनी घेतली आहे.
यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासन हैराण झाले असून या साथीला आटोक्यात आणण्याकरिता विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. शासनाने गणेशोत्सवाबाबत निर्देशही जारी केले आहेत. पालिकेच्या अधिकाऱ्यांची शुक्रवारी शहरातील गणेशोत्सवाच्या नियोजनसंदर्भात प्राथमिक बैठक झाली. या बैठकीमध्ये पालिकेने उत्सवाचा आराखडा तयार करण्याबाबतही चर्चा झाली. गणेशमूर्ती स्टॉल, देखाव्याच्या आणि सजावटीच्या वस्तूंच्या स्टॉल्सना परवानगी द्यायची की नाही, गणेश विसर्जन व्यवस्था, कचरा संकलन, नागरिकांचा पालिकेच्या उपाययोजनांमधील सहभाग यावर चर्चा करण्यात आली.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता गणेश प्रतिष्ठापना आणि गणेश विसर्जनाच्या दिवशी होणारी गर्दी टाळण्याकरिता नागरिकांनी यंदा गणपतीच बसवू नयेत असे विधान एका अधिकाऱ्याने केल्याने त्याला काही अधिकाऱ्यांनी विरोध केला. श्रद्धा आणि नागरिकांच्या भावना यावरून बैठकीत खडाजंगी झाली. ही बैठक कोणताही ठोस निर्णय न होताच ही बैठक संपली. सर्व पक्षनेते, पालिका पदाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन निर्णय घेऊ असे आयुक्तांनी स्पष्ट केले. यावरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. काही राजकीय पक्षांनी प्रशासनाने असा निर्णय घेऊ नये, नागरिकांना अटी व शर्तींचे पालन करून उत्सव साजरा करू द्यावा अशी भूमिका घेतली आहे.
नागरिकांना घरगुती गणेशोत्सव साजरा करण्यावर निर्बंध लादले जाणार असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही असेही काही गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीपासून लोक घरगुती गणेशोत्सव साजरा करीत आहेत. त्याला अनेक वर्षांची परंपरा आहे. सर्व लोकांना सद्यःस्थितीचे भान आहे. प्रत्येकाला स्वतःच्या आरोग्याची काळजी आहे. आवश्यक खबरदारी घेऊन नागरिकांना उत्सव साजरा करू देण्यास प्रशासनाने आडकाठी करण्याची आवश्यकता नसल्याचे मतही व्यक्त केले जात आहे.
---------
एखाद-दुसरा अधिकारी म्हणजे पूर्ण प्रशासन होत नाही. गणेश मंडळांनी शासन-प्रशासनाला पूर्ण सहकार्य आणि शासनाच्या अटी व शर्तींच्या अधीन राहून उत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे. कर्म सद्यःस्थितीची जाणीव गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनाही आहे. परंतु, घरगुती उत्सवाची परंपरा मोडता कामा नये. हा श्रद्धेचा भाग आहे. अधिकऱ्यांनी बोलताना तारतम्य बाळगायला हवे. हा विषय संवेदनशील असून प्राप्त परिस्थिती, आजाराचे गांभीर्य आणि उत्सवाचे महत्व याचा विचार करून मार्ग काढावा. गणेशमूर्ती व साहित्य विक्रीसाठी वेळा ठरवून दिल्यास काही अडचण येणार नाही. लोक नियमांचे पालन करतील.
- अशोक गोडसे, अध्यक्ष, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
-----------
घरगुती गणेशोत्सवावर निर्बंध आणू नयेत. हा लोकांच्या भावनेचा विषय आहे. पालिका अधिकाऱ्यांची भूमिका चुकीची असून लोकांच्या घरापर्यंत जाणे योग्य नव्हे. गणेश मंडळे प्रशासनाला पूर्ण सहकार्य देणार आहेत. मग, घरगुती उत्सवाचा प्रश्न येतो कुठे? गर्दी टाळून मूर्ती खरेदी, साहित्य खरेदी, विसर्जन केले जाऊ शकते. फिजिकल डिस्टनसिंगचे नागरिक पालन करतील. लोकांनाही सद्यस्थिची जाणीव आहे. त्यामुळे नागरिक स्वतःच काळजी घेतील.
- बाळासाहेब मारणे, अध्यक्ष, बाबू गेणू मित्र मंडळ