भाषणबाजी करणाऱ्यांना विचारवंत म्हणणे चुकीचे
By admin | Published: February 20, 2015 12:25 AM2015-02-20T00:25:28+5:302015-02-20T00:25:28+5:30
‘एखादा विषय समजून न घेता त्यावर केवळ आवेशाने भाषणबाजी करून लोकांची मने जिंकणाऱ्या वक्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
पुणे : ‘‘एखादा विषय समजून न घेता त्यावर केवळ आवेशाने भाषणबाजी करून लोकांची मने जिंकणाऱ्या वक्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. विषयाचे पुरेसे ज्ञान, चिंतन, व्यासंग याचे भान नसणाऱ्या अशा वक्त्यांनाच सध्या विचारवंत समजले जात आहे. ही वृत्ती धोकादायक आहे,’’ असे मत ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी गुुरुवारी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुणे आणि महाराष्ट्र सहकारी मुद्रणालय आयोजित गोपाळ कृष्ण गोखले स्मृतिशताब्दी कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार एस. के. कुलकर्णी होते. याप्रसंगी गोखले यांचे नातू सुनील गोखले, महापौर दत्तात्रय धनकवडे, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजित निंबाळकर, कोषाध्यक्ष शांतीलाल सुरतवाला आदी उपस्थित होते. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज व गोपाळ कृष्ण गोखले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. गोखले यांच्या राजकीय व सामाजिक विचारांचा आढावा घेताना डॉ. मोरे म्हणाले की, गांधीजींनी गोखले यांना आपले राजकीय गुरू मानले.
सनदशीर व सात्त्विक वृत्तीने काम करणाऱ्या गोखले यांच्या स्वभावामुळे गांधीजींनी गोखले यांना निवडले. विशेष म्हणजे जेवढी प्रसिद्धी गांधीजींच्या वाट्याला आली, तेवढीच ती गोखले यांच्या वाट्याला येणे शक्य असतानाही त्यांनी मात्र पडद्यामागून समाजाचे भले कसे होईल, याचा सातत्याने विचार केला. विशिष्ट परिस्थितीत निर्माण झालेल्या एका राजकीय वातावरणाचा परिणाम गोखले यांच्यावर टिळकांच्या माध्यमातून दिसून आला. मात्र, भारतीय राजकारणाला वेगळी दिशा देण्यात गोखले यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. (प्रतिनिधी)
४सुनील गोखले म्हणाले की, आजच्या पिढीपर्यंत गोखले यांचा विचार पोहोचविणे गरजेचे असून महात्मा घडविण्याच्या त्यांच्या विचाराने एक काळ गाजवला. या प्रसंगी महापौर धनकवडे यांनी येत्या ९ मेपर्यंत गोखले यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त स्मारक करण्याची आपली भूमिका राहील, असे स्पष्ट केले. अंकुश काकडे यांनी स्वागत व प्रास्तविक केले. जयराम देसाई यांनी सूत्रसंचालन केले.