मूल्यांची प्रतारणा होऊ न देणे ही आपली जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 04:20 AM2018-04-03T04:20:57+5:302018-04-03T04:20:57+5:30

शॉप अ‍ॅक्टखाली आलो म्हणून डॉक्टरांनी स्वत:ला व्यावसायिक मानणे योग्य नाही. कारण व्यवसाय म्हटले की त्यात साम, दाम, दंड, भेद वापरून काम करण्यात येते. सरकार आपल्याला काय म्हणते त्यापेक्षा आपण स्वत:ला काय मानतो हे महत्त्वाचे आहे.

 It is your responsibility to stop the assault of values | मूल्यांची प्रतारणा होऊ न देणे ही आपली जबाबदारी

मूल्यांची प्रतारणा होऊ न देणे ही आपली जबाबदारी

Next

पुणे - शॉप अ‍ॅक्टखाली आलो म्हणून डॉक्टरांनी स्वत:ला व्यावसायिक मानणे योग्य नाही. कारण व्यवसाय म्हटले की त्यात साम, दाम, दंड, भेद वापरून काम करण्यात येते. सरकार आपल्याला काय म्हणते त्यापेक्षा आपण स्वत:ला काय मानतो हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्यामधील मूल्यांची प्रतारणा होऊ न देणे ही आपली जबाबदारी आहे, असे मत मेळघाटात आरोग्य विषयक काम करणारे डॉ. रवींद्र कोल्हे यांनी रविवारी व्यक्त केले.
जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (जीपीए) च्या नवीन कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ टिळक रोडवरील डॉ. के. एच. संचेती हॉल येथे पार पडला. त्या वेळी ते बोलत होते.
डॉ. स्मिता कोल्हे, निष्कर्ष लॅबचे प्रमुख डॉ. राम साठ्ये, जीपीएचे मावळते अध्यक्ष डॉ. संतोष गोसावी, नवनियुक्त अध्यक्ष डॉ. प्रवीण दरक, माजी अध्यक्ष संजय वाघ, अभिनेत्री प्राजक्ता माळी, उपाध्यक्षा डॉ. संगीता खेनट, सचिव डॉ. धनश्री वायाळ आदी या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ. गोसावी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे डॉ. दरक यांच्या हाती सोपवली. तसेच जीपीए आणि रिबर्थ संस्थेच्या वतीने वर्षभर राबविण्यात येणाºया अवयवदान मोहिमेचा शुभारंभ कार्यक्रमात करण्यात आला. त्याच्या पोस्टरचे अनावरण उपस्थितांच्या हस्ते केले.
सध्या सुमारे ९९ टक्के डॉक्टर योग्यरीत्या आपली जबाबदारी पार पाडत आहेत. मात्र उर्वरित एका टक्क्यामुळे हा पेशा बदनाम होत आहे. डॉक्टरांनी चुकीचे काही केले की, लगेच त्यावर फोक स करण्यात येतो. मात्र त्यांच्या चांगल्या कामाची कोणी दखल घेत नसल्याची खंत डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केली.
शेवटचा दिवस गोड करण्यासाठी जगावे. आपल्या बँक खात्यातील एकावर किती शून्य आहेत, याचे मूल्य मोठे की जगण्याचे समाधान, याचा विचार आजच्या पिढीने करावा, असेही ते म्हणाले.
स्मिता कोल्हे म्हणाल्या, की स्त्रीभ्रूणहत्या होतेय म्हणून आपण मोर्चे काढले. पण आदिवासी संस्कृतीमध्ये कधीच स्त्रीभ्रूणाची हत्या होत नाही. तेथे वृद्धाश्रम नाहीत. स्त्रियांनी कमावलेल्या प्रत्येक गोष्टीवर फक्त त्यांचाच हक्क आहे. आपल्या ताटातील अर्धी भाकर देण्याची वृत्ती मेळघाटात असल्यानेच आम्ही तेथे काम करतोय. खजिनदार डॉ. रुपा अगरवाल यांनी सूत्रसंचालन केले.

नको त्या उपचारासांठी भाग पाडणे चुकीचे
रुग्णाला काहीही झालेले नसताना त्याला नको ते उपचार घेण्यासाठी भाग पाडणे, ही वृत्ती चुकीची आहे. गरजेपुरती मालमत्ता असणे मान्य. मात्र हाव कधीही करू नये, असे साठे म्हणाले.
डॉ. दरक म्हणाले, जीपीएच्या वतीने आतापर्यंत अनेक सामाजिक कामे केली आहेत. त्यामुळे ही डॉक्टरांची नाही तर एक सामाजिक संघटना आहे. येत्या वर्षभरात अवयवदानाचे ५० हजार अर्ज भरण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी डॉक्टर देत असलेल्या सेवेबद्दल त्यांचे आभार मानले.

नवीन पदाधिकारी

डॉ. प्रवीण दरक - अध्यक्ष
डॉ. संतोष गोसावी - माजी अध्यक्ष
डॉ. संगीता खेनट - उपाध्यक्ष
डॉ. रूपा अगरवाल - खजिनदार
डॉ. धनश्री वायाळ - सचिव
डॉ. शिवाजी कोल्हे - सचिव
डॉ. हरिभाऊ सोनवणे - सहसचिव
डॉ. शुभदा जोशी - सहसचिव

Web Title:  It is your responsibility to stop the assault of values

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.