नोकरांनी घरमालकीणीला दिले गुंगीचे औषध; बेशुद्ध करून पळविला लाखोंचा ऐवज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 01:23 PM2021-12-09T13:23:57+5:302021-12-09T13:24:07+5:30
घरातील लोखंडी लॉकर फोडून तसेच लाकडी कपाटे उघडून दीड लाख रुपये रोख रक्कम, सोन्याचे दागिने चोरून नेले
पिंपरी : नोकरांनी घरमालकीण आणि तिच्या दोन मुलांना गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर नोकरांनी घरातून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. गोल्डन आर्च सोसायटी, बावधन येथे मंगळवारी रात्री सव्वाबाराच्या सुमारास ही घटना घडली.
हितेश सुभाषचंद्र धिंग्रा (वय ४६, रा. गोल्डन आर्च सोसायटी, बावधन) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. किशोर व त्याची पत्नी पूजा (दोघे रा. नेपाळ) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हितेश धिंग्रा यांची बहीण श्रुती रवी खोसला यांच्या घरात आरोपी किशोर आणि त्याची पत्नी पूजा दोघेजण घरकाम करत होते. आरोपींनी श्रुती आणि त्यांच्या दोन मुलांना गुंगीकारक औषध दिले. त्यामुळे श्रुती आणि त्यांची दोन्ही मुले बेशुद्ध झाले. त्यानंतर आरोपींनी घरातील लोखंडी लॉकर फोडून तसेच लाकडी कपाटे उघडून दीड लाख रुपये रोख रक्कम, सोन्याचे दागिने चोरून नेले. पोलीस उपनिरीक्षक संदीप बोरकर तपास करीत आहेत.