औंध येथील आयटीआयचे विद्यार्थी शिकणार रोबोटिक तंत्रज्ञान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 07:35 PM2018-05-24T19:35:08+5:302018-05-24T19:35:08+5:30
येत्या शैक्षणिक वर्षापासून रोबोटिक व मेकॅट्रोनिक्स या विषयावर आधारित प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे.
पुणे : औंध येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) विद्यार्थ्यांना रोबोटिक तंत्रज्ञानाचे धडे दिले जाणार आहेत. हे तंत्रज्ञान शिकविणारे देशातील हे पहिले ‘आयटीआय’ असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यासाठी संस्थेमध्ये स्वतंत्र कक्षाची उभारणी करण्यात आली आहे.
मागील काही वर्षांपासून रोबोटिक तंत्रज्ञानाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी करिअरचे नवीन दालन खुले झाले आहे. यापार्श्वभुमीवर औंध आयटीआयमध्ये सुरू होणाऱ्या नवीन अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. औंध आयटीआय तंत्र सल्लागार समितीचे अध्यक्ष आमदार विजय काळे यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी प्राचार्य प्रकाश सायगावकर उपस्थित होते. संस्थेमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून रोबोटिक व मेकॅट्रोनिक्स या विषयावर आधारित प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी मिळणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी संस्थेला एकुण २ कोटी ६८ लाख रूपयांचा निधी मिळाला आहे. त्यापैकी ७५ टक्के निधी केंद्र सरकार व २५ टक्के निधी राज्य सरकारकडून मिळत आहे.कंपन्यांमध्ये आवश्यक असणारे रोबोटिक्सचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना आयटीआय मध्ये मिळणार आहे.
रोबोटिक्स प्रोग्राम हा १ महिन्याचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम असून त्याची प्रवेशक्षमता १८ इतकी आहे. प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य यानुसार प्रवेश दिले जाणार आहेत. अभियांत्रिकीची पदवी, पदविका किंवा आयटीआय असलेला विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र आहे. मेकॅट्रॉनिक्सला पूरक असलेल्या रोबोटिक्स तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रमासाठी जपानच्या यासकावा या कंपनीने सुमारे ९३ लाख रुपये किंमतीचे दोन रोबोट दिले आहेत. संस्थेमार्फत माफक शुल्कात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. डी.व्ही. कुलकर्णी व एन.एम. काजळे यांच्यावर अभ्यासक्रमाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, असे काळे यांनी सांगितले.
----------