वर्ष झाले... आतातरी चाचणी घेऊन नोकरी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:12 AM2021-03-23T04:12:12+5:302021-03-23T04:12:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : परीक्षेत पात्र होऊनही केवळ वाहनचाचणी न झाल्याने ३ हजार उमेदवार एसटी महामंडळातील नोकरीपासून दोन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : परीक्षेत पात्र होऊनही केवळ वाहनचाचणी न झाल्याने ३ हजार उमेदवार एसटी महामंडळातील नोकरीपासून दोन वर्ष वंचित आहेत. महामंडळाच्या जिल्हा प्रशासनाकडे वारंवार दाद मागूनही दखल घेतली गेली नसल्याने त्यांनी आता परिवहन मंत्री व महाव्यवस्थापकांकडे तक्रार केली आहे.
नोकरीच्या प्रतीक्षेतील उमेदवारांनी मुंबईत शुक्रवारी एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक माधव काळे यांची भेट घेतली. बीड शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंडलीक खाडे त्यांना मुंबईत घेऊन आले होते. या उमेदवारांनी शब्दशः गयावया करत काळे यांच्याकडे चाचणीसंदर्भात त्वरित निर्णय घेण्याची विनंती केली. परिवहन मंत्री अनिल परब यांनी चाचणी घेण्याचे आदेश देऊनही कोणीच जुमानत नसल्याचे त्यांनी सांगितले. निकालच लागत नसल्याने दुसरीकडे संधी असूनही जाता येत नाही, अशी व्यथा त्यांनी मांडली. काळे यांंनी त्यांना लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.
वर्षभरापूर्वी महामंडळाने चालक तथा वाहक पदासाठी जाहिरात दिली. जिल्ह्यातील १ हजार ६४७ जागांसाठी ६५०० अर्ज आले. परीक्षेनंतर ३ हजार ६०० राहिले. वैद्यकीय चाचणीत ३ हजार राहिले. त्यांची वाहन चाचणी घेऊन लेखी परीक्षा व वाहन चाचणी यांच्या एकत्रित गुणांची मेरीट लिस्ट तयार करून त्यानुसार पात्र उमेदवारांना नोकरीत घ्यायचे होते.
तीन हजारपैकी २३०० जणांची चाचणी घेतली, ७०० जण तसेच राहिले. आता वर्ष झाले तरी प्रशासनाने त्यांची चाचणी घेतली नाही, त्यामुळे यादी तयार झाली नाही आणि ३ हजार जण नोकरीच्या आशेत बसून आहेत. वाहन चाचणीचा ट्रॅक खराब झाल्याचे कारण देत महामंडळाचे जिल्हा प्रशासन त्यांना त्रास देत आहे. यात एसटी चालवण्यासाठी परवान्यासह तयार असलेल्या २५ महिला उमेदवारही आहेत.
--
पुणे जिल्ह्यातीलच भरती अजून बाकी
राज्यातील सर्व जिल्ह्यांची चाचणी झाली, पात्र उमेदवार नोकरीवर रूजूही झाले. पुणे जिल्ह्यातीलच भरती अजून बाकी आहे व कोणीच त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही.
- परीक्षेत पात्र झालेले त्रस्त उमेदवार