या वर्षी पहिल्यांदाच आले, इथून पुढं दरवर्षी येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 07:07 PM2019-01-01T19:07:50+5:302019-01-01T19:10:30+5:30
काेरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखाे भीम अनुयायी आले हाेते. इथे आल्यानंतर महार सैनिकांनी दाखविलेल्या शाैर्याचा त्यांना अभिमान वाटत हाेता.
पुणे : बाबासाहेबांनी आमच्यासाठी, जगासाठी एवढं केलं मग त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालयाला नकाे का, त्यांच्यासाठी एक दिवस द्यायलाच पायजे म्हणून मी इथे आले. या वर्षी पहिल्यांदाच आले, इथून पुढं आता दरवर्षी येणार. काेरेगाव भीमा येथील विजयस्तंभाजवळच्या पटांगणात बसलेल्या शांताबाई साेळस सांगत हाेत्या.
मागील वर्षी काेरगाव भीमा येथील लढाईला 200 वर्षे पुर्ण झाल्यामुळे लाखाे आंबेडकर अनुयायी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आले हाेते. यावेळी येथे उसळलेल्या दंगलीमध्ये हजाराे आंबेडकर अनुयायांच्या गाड्यांचे नुकसान करण्यात आले हाेते. या दंगलीत एका तरुणाचा मृत्यू देखील झाला हाेता. या दंगलीचे पडसाद देशात उमटले हाेते. यंदा माेठा पाेलीस बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता.
यंदाच्या वर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत कितीतरी अधिक पटीने आंबेडकर अनुयायी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आले हाेते. शांताबाई या पहिल्यांदाच आल्या हाेत्या. काेरेगाव भीमाच्या विजयस्तंभाचा इतिहास त्यांना फारसा माहित नव्हता परंतु बाबासाहेब या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांनी हे आपल्या शाैर्याचे प्रतिक आहे असे सांगितले एवढेच त्यांना माहित हाेते. त्यामुळे इथे आलंच पाहिजे असं त्यांनी मनाशी पक्क ठरवलं हाेतं. शांताबाई त्यांचा मुलगा आणि गावातील इतर लाेकांबराेबर औरंगाबादच्या पदमपुरी या गावातून आल्या हाेत्या. इथं आल्यावर मन भरुन आलं. अभिमान वाटला असं शांताबाई आवर्जून सांगत हाेत्या.
शांताबाई म्हणाल्या, आंबेडकरांनी जगासाठी एवढं केलं मग त्यांच्यासाठी आपण एक दिवस तरी द्यायलाच पाहिजे. या वर्षी मी पहिल्यांदाच इथं आले, परंतु या पुढे दरवर्षी येणार. बाबांनी आम्हाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. आणि हा विजयस्तंभ म्हणजे जातीयता माेडून टाकण्याचं पहिलं पाऊल आहे. आता जातीयता कमी झाली असली तरी ती अजून संपली नाही.