ज्या शहराने घडवलं त्या शहराला साेडून जाणे याेग्य नाही ; तरुणीची गरजूंना मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 05:25 PM2020-05-09T17:25:20+5:302020-05-09T17:26:13+5:30
पुण्यावर काेराेनारुपी संकट ओढावलेले असताना या शहराला साेडून न जाता शहरात राहून गरजूंना मदत करण्याची निर्णय काही तरुणांनी घेतला.
पुणे : लॉकडाऊन जाहीर झालं आणि अनेकांनी शहरातून आपल्या गावाची वाट धरली. कामगारांचे रोजगार बुडाले, विद्यार्थ्यांच्या मेस बंद झाल्या, त्यामुळे गावी परतन्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. परंतु ज्या शहराने आपल्याला सर्वकाही दिलं, आपल्याला घडवलं त्या शहराला संकटाच्या काळात सोडून जायला नको असं तिला वाटलं आणि शहरातच राहून गरजूंना मदत करण्याचा निर्णय तिने घेतला. ही कहाणी आहे पुण्यात गरजूंना मदत करणाऱ्या प्रियांका चौधरी या तरुणीची
प्रियांका शिक्षणासाठी पुण्यात आली. पुण्याने शिक्षणतर दिलंच त्याचबरोबर एक ओळख सुद्धा दिली. प्रियंका आणि तिच्या साथीदारांनी ओपन बुक लायब्ररी ची चळवळ पुण्यात चालवली. त्याला चांगलं प्रतिसाद मिळाला. कोरोनाचे संकट पुण्यावर ओढवलेले असताना तिने गावी न जाता पुण्यातच राहण्याचा निर्णय घेतला. ज्या शहराने आपल्याला घडवले त्या शहरासाठी काहीतरी करण्याचे तिच्या मनात होते. ती ज्या ठिकाणी राहते तेथील घरमालक आणि इतर साथीदार मिळून त्यांनी गरजूंना मदत करण्याचा निर्णय घेतला. प्रियांकाने आपल्या वाढदिवसासाठी जमवलेले पैसे गरजूंसाठी वापरण्याचे ठरवले.
प्रियांका आणि तिचे साथीदार रोज शंभरहून अधिक गरजू नागरिकांना नाश्त्याचे वाटप करतात. त्याचबरोबर ज्या मजुरांची राहण्याची सोय प्रशासनाने विविध शाळांमध्ये केली आहे त्या नागरिकांना विविध सामानाचे वाटप देखील त्याच्याकडून करण्यात येत आहे. लाेकमतशी बाेलताना प्रियांका म्हणाली, पुण्यात अडकलेले मजूर, हातावर पाेट असणारे लाेक यांचे लाॅकडाऊनमुळे अनेक हाल हाेत हाेते. दाेन वेळच्या जेवणाची त्यांना भ्रांत हाेती. त्यामुळे पुण्यात थांबून या नागरिकांना मदत करण्याचा निर्णय घेतला. माझ्या सहकाऱ्यांशी बाेलून आम्ही विविध मदत करण्यास सुरुवात केली. ज्या नागरिकांना राशन हवे हाेते त्यांना राशन दिले. ज्यांना इतर जीवनावश्यक वस्तूंची गरज हाेती त्यांना त्या दिल्या. त्याचबराेबर 100 हून अधिक नागरिकांची राेज नाश्त्याची साेय आम्ही केली. माझ्या जडणघडणीत पुण्यात माेठा वाटा आहे. त्यामुळे शहरावर संकट आलेले असताना आपण इथे राहून गरजूंना मदत करणे आवश्यक आहे असा विचार करुन पुण्यातच थांबण्याचा निर्णय घेतला.
पाहा व्हिडीओ