...त्यात नेत्यांचा काही दोष नसतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:08 AM2021-06-21T04:08:44+5:302021-06-21T04:08:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कार्यक्रमांना गर्दी होत असेल तर त्यात नेत्यांचा काही दोष नसतो. संयोजकांनी काळजी घेतली पाहिजे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कार्यक्रमांना गर्दी होत असेल तर त्यात नेत्यांचा काही दोष नसतो. संयोजकांनी काळजी घेतली पाहिजे. लोकांनी तारतम्य बाळगले पाहिजे, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यक्रमांना होणाऱ्या गर्दीबाबत कार्यकर्ते आणि संयोजकांच्या कोर्टात चेंडू भिरकावला आहे.भाजपच्या कार्यक्रमालाही गर्दी होण्याच्या शक्यतेने त्यांनी या प्रकरणात बचावात्मक भूमिका घेतली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात झालेल्या गर्दीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केले जात आहे. मात्र, प्रत्येकवेळेला टीका करायला पाहिजेच असे नाही असे सांगून पाटील यांनी अजित पवार यांचा बचाव केला. संयोजकांनी कार्यक्रम आॅनलाईन दाखविले पाहिजेत. कार्यक्रम आॅनलाईन असता तर एवढी गर्दी झाली नसती..अजित पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील त्यांच्या अनुयायांनी त्यांना अडचणीत आणू नये, असे सांगून त्यांनी गर्दीचे खापर हे संयोजक आणि नागरिकांवर फोडले. एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्ही महाविकास आघाडी सरकार केले म्हणजे हिंदुत्व सोडले असे नाही अशाप्रकारचे वक्तव्य केले होते. त्यावर विचारले असता अठरा महिन्यांत हिंदुत्वापासून कसे बाजूला सरलात? महाशिव आघाडीची महाविकास आघाडी कशी झाली? असा टोला त्यांनी ठाकरे यांना लगावला. राजकीय परिणामांची काळजी न करताही ठाकरे यांना आपण अजूनही हिंदुत्ववादी आहोत असे वाटते याचे मला विशेष वाटते अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली.
-----------------------------------------------