प्रभातचा इतिहास झाला ‘बोलका’, ‘इट्स प्रभात’ माहितीपटाचे सादरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 04:07 AM2018-05-08T04:07:06+5:302018-05-08T05:00:01+5:30
‘प्रभात’ म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक सोनेरी पान. प्रभात म्हटले की अयोध्येचा राजा, संत तुकाराम, रामशास्त्री, संत एकनाथ, माणूस, शेजारी अशा अनेक चित्रपटांची शृंखला डोळ्यांसमोर येते. हे चित्रपट जडणघडणीचा दुर्मिळ असा दस्तावेज आहेत. हे चित्रपट घडले कसे? त्याची निर्मिती प्रक्रिया? याबद्दल खूप कमी जणांना माहिती आहे.
पुणे - ‘प्रभात’ म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक सोनेरी पान. प्रभात म्हटले की अयोध्येचा राजा, संत तुकाराम, रामशास्त्री, संत एकनाथ, माणूस, शेजारी अशा अनेक चित्रपटांची शृंखला डोळ्यांसमोर येते. हे चित्रपट जडणघडणीचा दुर्मिळ असा दस्तावेज आहेत. हे चित्रपट घडले कसे? त्याची निर्मिती प्रक्रिया? याबद्दल खूप कमी जणांना माहिती आहे. हाच निर्मितीमागचा प्रवास ‘इट्स प्रभात’ म्हणून सोमवारी उलगडला. प्रभातचा इतिहासच जणू बोलका झाला.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सांस्कृतिक कट्टा उपक्रमांतर्गत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माजी कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी संहिता लेखन आणि दिग्दर्शित केलेला ‘इट्स प्रभात’ हा माहितीपट दाखविण्यात आला. या वेळी संवाद पुणेचे सुनील महाजन, जयंत दामले, पत्रकार संघाचे शैैलेश काळे उपस्थित होते.
या माहितीपटाबद्दल सांगताना डॉ. माधवी वैद्य म्हणाल्या, ‘इट्स प्रभात’ २००५ मध्ये राष्ट्रीय स्पर्धेत झळकला होता. स्पर्धेत १३५ माहितीपट होते. या महितीपटासह दिग्दर्शनासाठी मला रजतकमळ मिळाले. प्रभातच्या तुतारीमुळे भारताला चित्रपट माध्यमात ओळख मिळाली.
अविश्वास, आळस आणि असभ्यता हे शब्द प्रभात फिल्म कंपनी संचालकांच्या कोशातच नव्हते. सचोटी आणि प्रामाणिकपणाच्या बळावर प्रभातने गरुडझेप घेतली. विविध ३५ विभागांचे चोख व्यवस्थापन हे प्रभातचे वैशिष्ट्य होते. पहिला बालपट, पहिला अॅनिमेशनपट, कुंकू चित्रपटाचे ट्रेलर असे नावीन्यपूर्ण प्रयोग प्रभातनेच केले. उच्च ध्येयनिर्मिती असल्याने प्रभातचे चित्रपट टिकून राहिले.
संत एकनाथांच्या
भूमिकेत बालगंधर्व
४ बालगंधर्वांनी कंठस्वर आणि अभिनयाच्या बळावर संगीत नाटके अजरामर केली. त्यांना स्त्री वेशभूषेतच रसिकांना पाहण्याची सवय होती. धर्मात्मा चित्रपटात संत एकनाथ यांची भूमिका ते पडद्यावर साकारत होते. मात्र चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत त्यांचे छायाचित्र समोर आणले नाही. या माहितीपटामध्ये बालगंधर्वांच्या संत एकनाथचे दर्शन घडले.
दि.१ जून १९२९ रोजी विष्णुपंत दामले, एस. फत्तेलाल, व्ही. शांताराम, केशवराव धायबर, सीताराम बी. कुलकर्णी यांनी प्रभात फिल्म कंपनीची स्थापना केली. या माहितीपटाद्वारे फिल्म अँंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधील प्रभात स्टुडिओ, त्या ठिकाणी साकार झालेल्या चित्रपटांच्या आठवणी दिग्दर्शक राम गबाले, बेबी शकुंतला, सुमती गुप्ते, मंजू दिवाण, अरुणा दामले, यशवंत निकम, पहिल्या आॅर्गनवादक इंदिरा लाटकर, गंगाधर महांबरे, स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी, बापू वाटवे, फोटोग्राफर बाळ फाटक यांनी उलगडल्या. माहितीपटाचे संकलन संजय दाबके, महेश फुंडकर यांचे, ध्वनीसंयोजन अतुल ताम्हनकर, संगीत संयोजन राहुल घोरपडे यांचे आहे. निवेदन डॉ. वृषाली पटवर्धन आणि अजित सातभाई यांनी केले असून, माहितीपटाला अरुणा दामले यांचे मार्गदर्शन लाभले.