आयव्हीएफ सेंटर महापालिकेच्या ‘रडार’वर
By admin | Published: June 30, 2015 12:36 AM2015-06-30T00:36:56+5:302015-06-30T00:37:18+5:30
स्त्रीभ्रूणहत्या रोखण्याबरोबरच गर्भलिंगनिदान आणि बेकायदेशीरपणे केल्या जाणाऱ्या गर्भपातांच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी सोनोग्राफी केंद्राची कडक तपासणी केली जात आहे.
पुणे : स्त्रीभ्रूणहत्या रोखण्याबरोबरच गर्भलिंगनिदान आणि बेकायदेशीरपणे केल्या जाणाऱ्या गर्भपातांच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी सोनोग्राफी केंद्राची कडक तपासणी केली जात आहे. मात्र, इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) केंद्रांमध्ये गर्भधारणेसाठी बीजरोपण झाल्यानंतर त्या गर्भाचे पुढे काय होते, याची कोणतीही माहिती महापालिकेला उपलब्ध होत नाही. त्यामुळे या आयव्हीएफ पद्धतीमुळे गर्भधारणेनंतर गर्भलिंगनिदान होत असल्याचा संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरातील सर्व आयव्हीएफ केंद्राचा गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्यामध्ये नव्याने समावेश करण्यात आला असून, या केंद्रावर महापालिकेकडून लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. वाढत्या धकाधकीच्या बदलत्या जीवनशैलीमुळे लग्न उशिरा होणे, कामाचा ताण यासह अन्य कारणामुळे अनेक दाम्पत्यांना मूलबाळ होत नाहीत. त्यामुळे महागड्या इन व्हिट्रो फर्जिलाझेशन (आयव्हीएफ) या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. या पद्धतीमध्ये स्त्री बीज आणि पुरुष बीज एकत्र केले जाते आणि त्यामाध्यमातून गर्भधारणा केली जाते. त्यानंतर सामन्य गर्भाप्रमाणे याही गर्भाची वाढ होते. मात्र, सध्याच्या गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्यामध्ये या आयव्हीएफ केंद्राच्या तपासणीची तरतूद नव्हती. केवळ सोनोग्राफी केंद्र आणि गर्भपात केंद्राची तपासणीच या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेकडून केली जात होती. पण, मूल होत नसल्याने आणि पैसे खर्च करण्याची क्षमता वाढल्याने आयव्हीएफ केंद्राचा आधार घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पण, या केंद्रामध्ये कोणी उपचार घेतले, कधी घेतले, गर्भलिंग निदान करण्यात आले का? याची माहिती महापालिकेसह राज्य सरकार, केंद्र सरकारच्या कोणत्याही विभागाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे अशा आयव्हीएफ केंद्राची नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्ली येथे नुकतेच्या झालेल्या राष्ट्रीय बैठकीमध्ये याबाबत निर्णय झालेला आहे. आयव्हीएफसह असिस्टेड रिप्रोडक्टीव्ह टेक्नॉलॉजी (एआरटी) केंद्राचीही या पुढे तपासणी केली जाणार आहे. या दोन्ही प्रकारच्या केंद्रांमध्ये गर्भधारणा तसेच गर्भधारणेनंतरच्या जवळपास २० प्रकारच्या तपासण्या केल्या जातात. (प्रतिनिधी) २१ केंद्रांचा समावेश शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून ‘आयव्हीएफ’ केंद्र सुरू आहेत. पण, गर्भलिंग निदान कायद्यामध्ये या केंद्राचा समावेश नव्हता. त्यामुळे त्यांची तपासणी केली जात नव्हती. पुण्यात २१ आयव्हीएफ सेंटर्स आहेत. त्यांच्या नोंदणीचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे या केंद्रामध्ये महिलेचे नाव, वय, पत्ता, गर्भधारणेची तारीख ही माहिती महापालिकेला कळवावी लागेल. त्यांना आॅनलाईन ‘फार्म एफ’ ही भरून द्यावे लागतील, असे महापालिकेच्या सहायक आरोग्यप्रमुख डॉ. वैशाली जाधव यांनी सांगितले. त्यामुळे पहिल्यांदाच या केंद्रावर महापालिकेचे लक्ष राहणार असल्याचेही डॉ. जाधव यांनी स्पष्ट केले. - महापालिकेतर्फे शहरातील सोनोग्राफी केंद्रांची नियमित तपासणी केली जाते. पण, कायद्यात तरतूद नसल्याने आयव्हीएफ सेंटर या तपासणीबाहेर होते.