जे. एन. पटेल समिती म्हणजे केवळ धूळफेक - प्रकाश आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 02:16 AM2018-02-11T02:16:05+5:302018-02-11T02:16:12+5:30
भीमा कोरेगाव दंगल प्रकरणाची विद्यमान न्यायाधीशांमार्फत न्यायालयीन चौैकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेला सांगितले होते. मात्र, आता त्यांनी सोयिस्करपणे निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमली आहे. यात प्रशासनातील मुख्य सचिवही नेमला असून, मुख्यमंत्र्यांनी केलेली ही केवळ धूळफेक आहे, असे भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
पुणे : भीमा कोरेगाव दंगल प्रकरणाची विद्यमान न्यायाधीशांमार्फत न्यायालयीन चौैकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेला सांगितले होते. मात्र, आता त्यांनी सोयिस्करपणे निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमली आहे. यात प्रशासनातील मुख्य सचिवही नेमला असून, मुख्यमंत्र्यांनी केलेली ही केवळ धूळफेक आहे, असे भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
आंबेडकर म्हणाले, ‘‘भिडे-एकबोटेंना अटक करण्याऐवजी सरकार वेळ मारून नेत आहे. विद्यमान न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौैकशी व्हावी, तसेच भिडे-एकबोटेंना अटक करावी, या मागणीवर आम्ही ठाम आहोत.’’
या समितीबाबत सामाजिक चळवळीतील नेत्यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिल्या. श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर म्हणाले, ही दंगल नक्षलवाद्यांनी घडविली, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. आता जी समिती नेमली आहे, ती फक्त याच्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी नेमली आहे का, की नेमकेपणाने चौैकशी करुन भिडे-एकबोटेंवर कारवाई होईल, याबद्दल साशंकता आहे.
सरकार भिडे-एकबोटेंना वाचविण्यासाठी तपास यंत्रणा वापरत असून, त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहील, असे रिपब्लिकन जनशक्तीचे नेते अर्जुन डांगळे यांनी सांगितले.
सत्यशोधक शेतकरी सभेचे कॉ. किशोर ढमाले म्हणाले, ‘दंगलीच्या चौकशीसाठी सत्यशोधन समिती स्थापन केली होती. समितीचा वस्तुनिष्ट अहवाल पोलिसांना दिला आहे. सरकारने कारवाई करायला हवी.
आज लखनऊमध्ये बैठक
संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना तत्काळ अटक करावी,महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी तरुण-तरुणींवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात ठेवले आहे, त्यांना तातडीने मुक्त करावे, भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आझाद यांची मुक्तता करावी आदी मागण्यांसाठी उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे उद्या (दि. ११) देशभरातील प्रमुख संघटनांच्या कार्यकर्त्यांची बैठक होत आहे. त्यात आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाईल.
- अॅड. प्रकाश आंबेडकर, राष्ट्रीय नेते, भारिप बहुजन महासंघ