जॅक ऑफ ऑल...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:10 AM2021-04-08T04:10:18+5:302021-04-08T04:10:18+5:30
आज आपण आपल्या व्यक्तिमत्वाभोवती बांध घालून घेतले आहेत. त्यामुळे जे इंजिनिअर आहेत त्यांनी साहित्य का वाचायचे? जे डॉक्टर आहेत ...
आज आपण आपल्या व्यक्तिमत्वाभोवती बांध घालून घेतले आहेत. त्यामुळे जे इंजिनिअर आहेत त्यांनी साहित्य का वाचायचे? जे डॉक्टर आहेत त्यांनी संगीत का ऐकायचे? जे वास्तुशास्त्राविशारद आहेत त्यांचा आणि नाटकाचा संबंध काय? संगणक अभियंत्याला बांधकामशास्त्र माहितच असले पाहिजे का? वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना मराठी व्याकरण समजलेच पाहिजे का? कलाशाखेला शिकणाऱ्यांना न्यूटनच्या गतिविषयक नियमांची संकल्पना समजणे गरजेचे आहे? का? असे प्रश्न अकारण उपस्थित करतो. जीवनाला समृद्ध करणाऱ्या सर्व ज्ञानक्षेत्राविषयी प्रत्येकाला उत्सुकता वाटायला काय? हरकत आहे? याचा विचार केला पाहिजे.
परीक्षेत चमकणाऱ्या मुलांचे अनेकदा अभ्यास, पुस्तके आणि परीक्षा एवढेच विश्व असते. त्याखेरीज त्यांना काहीही माहीत नसते. अनेकदा मेरिटमध्ये येणाया मुलांच्या बायोडाटामध्ये हॉबिज या सदरात वाचन असे लिहिलेले असते; पण प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळी तुझ्या आवडत्या लेखकाचे नाव काय? त्या लेखकाची तू वाचलेली पुस्तके कोणती? या प्रश्नावर मात्र त्यांना मौन बाळगण्याखेरीज पर्याय नसतो. अभ्यासासाठी नेमून दिलेली पुस्तकेच वाचायची. इतर गोष्टींशी माझा काय? संबंध, अशी वृती असल्यामुळेच व्यक्तिमत्वाची खूप हानी होते. जीवन सर्वांगाने समजून घेण्याची जिज्ञासा प्रत्येकात असली पाहिजे.
काही वर्षांपूर्वी परीक्षेतील गुण म्हणजेच गुणवत्ता आणि हुशारी असे समीकरण होते. आज परिस्थिती बदलली आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात परिक्षेतल्या गुणांपेक्षाही तुमचे व्यक्तिमत्व बहुआयामी असेल तर सर्वच क्षेत्रात तुमच्या वाट्याला येणाऱ्या संधी अधिक असतात. त्यासाठी मळलेल्या वाटेने जाण्याची मानसिकता सोडून दिली पाहिजे. आज आपण ज्ञानशाखांचे कप्पे करून टाकले आहेत. एका कप्प्याचा दुस-याशी संबंध नाही. त्यामुळेच एकांगी व्यक्तिमत्वाची माणसे सर्वत्र अधिक संख्येने दिसतात. बहुआयामी व्यक्तिमत्वाची माणसे अभावानेच दिसतात. हे चित्र बदलण्यासाठी साचेबंदपणा पारंपारिक स्वभाव सोडून दिला पाहिजे. क्रमिक पुस्तकाइतकेच जीवनाचे पुस्तकही मनोभावे वाचले पाहिजे.
ज्यांच्या नावे गेली अनेक वर्षे नोबेल पुरस्कार दिला जातो ते आल्फ्रेड नोबेल यांनी डेटोनेटरचा शोध लावला. ते स्वत: कवी आणि साहित्याचे अभ्यासक होते. त्यानी तत्वज्ञानाचा अभ्यास करून अनेक गृहितकेही मांडली. हिवतापाच्या प्रसाराचे रहस्य उलगडणारे नोबेल पुरस्कार प्राप्त रोनाल्ड रोस हे नुसते डॉक्टर किवा संशोधक नव्हते, तर ते उत्तम गणिती होते. चांगले कवी, नाटककार आणि लेखक होते. एव्हढेच नवे तर उत्तम संगीतकार आणि चित्रकार ही होते. अध्यात्मिक क्षेत्रात सर्वोच्च स्थानावर पोचलेल्या मीरा रिचर्ड (मदर) या उत्तम टेनिसपटू होत्या. त्या वनस्पतीशास्त्राच्या जाणकार होत्या. प्राणी सृष्टीतील संभाव्य परिवर्तन हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. त्या चित्रकार आणि संगीततज्ज्ञ होत्या, लोकमान्य टिळकांचे गणिताप्रमाणेच मराठी व्याकरण आणि संस्कृतवरही प्रभुत्व होते. अष्टपैलू हा शब्दसुद्धा ज्यांचासाठी थिटा पडावा अशी या प्रज्ञावंतांची कितीतरी उदाहरणे देशात आणि जगभरात आपल्याला दिसतात.
‘जॅक ऑफ ऑल अँड मास्टर ऑफ नन’ असे गमतीने म्हटले जाते; पण अनेकविध विषयात आणि क्षेत्रात प्रभुत्व असणारी बुद्धिवंतांची ही मांदियाळी पाहिल्यावर आपण अचंबित होतो. ही माणसे असामान्य आणि आपण अतिसामान्य असं म्हणत आपण पळवाटा शोधतो आणि स्वत:चीच फसवणूक करून घेतो. या माणसांचा प्रवास सामान्याकडून असामान्याकडे झाला हे आपण सोयीस्करपणे विसरतो.
या जगात कोणतीही गोष्ट सहजसाध्य नाही हे जितके खरे तितकीच ती असाध्य नाही. हे ही तितकेच खरे. गरज आहे ती ठोकळेबाज मानसिकता बदलण्याची. सतत नवे काही तरी शिकत राहण्याची ऊर्मी जपण्याची.
- प्रा. मिलिंद जोशी, लेखक, भारती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत.