घरकाम करणाऱ्या तरुणीला धीर देण्यासाठी जॅकीदादा थेट तिच्या घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 15:56 IST2021-03-13T15:55:18+5:302021-03-13T15:56:16+5:30
जॅकी श्रॉफ आले अन, कुटुंब भारावून गेलं

घरकाम करणाऱ्या तरुणीला धीर देण्यासाठी जॅकीदादा थेट तिच्या घरी
बॉलीवुडचे ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्याकडे घरकाम करणारी तरुणी दीपालीच्या आजीचं निधन झाल्याचे कळताच जॅकी दादा थेट दीपालीच्या राहत्या घरी पवनानगर मावळ येथे पोहोचले. त्यांना पाहून तरुणीचे कुटुंबीय अक्षरशः भारावून गेले होते.
जॅकी श्रॉफ लहानपणापासूनच वस्तीत आणि सामान्य माणसात वावरले आहेत. अशा माणसांच्या अडचणी, हलाखीची परिस्थिती, साधेपणा जाणून घेतच ते मोठे झाले आहेत. त्यांनी सुद्धा हलाखीच्या परिस्थितीवर मात करून अभिनेता होण्याचे यश मिळवले आहे.
श्रॉफ यांचा मावळ येथील चांदखेड येथे बंगला असून मुंबईमधून ते अनेकदा या ठिकाणी आराम करण्यासाठी येत असतात. अशाच एका भेटीदरम्यान श्रॉफ यांच्याकडे काम करणाऱ्या दीपालीच्या आजीचे शंभराव्या वर्षी नुकतच निधन झाल्याची माहिती त्यांना मिळाली. ही माहिती मिळताच त्यांनी तातडीने दिपालीच्या आजीचे घर गाठले. ठाकर कुटुंबाचे सांत्वन करत धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. जॅकी श्रॉफ यांनी घरातील सर्व सदस्यांशी चर्चा करत त्यांची विचारपूस केली. जॅकी यांच्यासारखा मोठा अभिनेता आजीच्या निधनानंतर सांत्वन करण्यासाठी थेट आपल्या घरी आल्याचे पाहून ठाकर कुटुंब भारावून गेले. जॅकी यांनी अगदी सर्वसामान्यांप्रमाणे जमीनीवर बसून घरातील वरिष्ठांचीही चौकशी करत त्यांना धीर दिला. जॅकी श्रॉफ यांनी यापूर्वीही अनेकदा अशाप्रकारे आपल्या साध्या वागणुकीमधून चाहत्यांची मन जिंकली आहेत.