Ashadhi Wari: फुलांची उधळण अन् माऊली - तुकोबांचा जयघोष; जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखीचे पुण्यात जल्लोषात आगमन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 05:53 PM2024-06-30T17:53:11+5:302024-06-30T17:53:19+5:30
लाखो वारकऱ्यांसमवेत संत तुकाराम महाराज पालखीचे पुण्यात आगमन झाले असून मुक्कामाच्या दिशेने वाटचाल सुरु
पुणे: हातात भगव्या पताका, डोक्यावरी तुळस, टाळ - मृदंगाचा गजर आणि माऊली - तुकोबांचा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात दखल झाली आहे. लाखो वारकऱ्यांचा मेळा पंढरीच्या दिशेने निघाला आहे. तुकाराम महाराजांच्या पालखीचे पुण्याच्या वेशीवर जल्लोषात स्वागत करण्यात आले. फुलांच्या उधळणीत नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्कामी जाणार आहे.
प्रमुख रस्त्यांवर पुणेकर आतुरतेने वाट पाहताना दिसून आले आहेत. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत नागरिक पालखीच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. शहारत मध्यवर्ती भागात चोख पोलीस बंदोबस्त आला आहे. तसेच प्रशासनाकडून वारकऱ्यांची विशेष काळजी घेतली जात आहे. सामाजिक संस्था, विद्यार्थ्यंनाकडून पर्यावरणपूरक संदेशही या पालखी सोहळ्यात दिले जात आहेत. महिला आणि तरुणींचा लक्षणीय सहभाग वारीच्या सोहळयात दिसू लागला आहे.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा शनिवारी रात्री आकुर्डीत मुक्कामास होता. आकुर्डीकरांचे आदरातिथ्य स्वीकारून विठ्ठल मंदिरातून रविवारी पहाटे पाचला सोहळा पुण्याकडे मार्गस्थ झाला. पहाटे ट्रस्टचे विश्वस्त गोपाळ कुठे यांच्या हस्ते महापूजा झाली. समाजआरती होऊन पालखी मार्गस्थ झाली. पालखी खंडोबा माळ चौकातून पुणे मुंबई महामार्गाने पिंपरीतील खराळवाडी येथील मंदिरात सकाळी ६:४५ वाजता सोहळा पोहोचला. तिथे पहिला विसावा झाला. त्यानंतर सकाळी ८:३० च्या सुमारास सोहळा पुढे मार्गस्थ झाला. मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांचे स्वागत करण्यात येत होते. तर ठिकठिकाणी राजकीय नेत्यांचे स्वागत फलक झळकल्याचे दिसून आले. त्यानंतर पालखी दर्शनासाठी नेहरूनगर, वल्लभनगर, परिसरातील भक्तांनी गर्दी केली होती. सकाळी साडेअकराच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सोहळ्याचा वेग कमी झाला. पिंपरी ते नाशिक फाटा उड्डाणपुलाच्या दुतर्फा गर्दी केली होती. पालखी सोहळा नाशिकफाटामार्गे दापोडीत दुपारच्या मुक्कामास थांबला. अनेक राजकीय पक्षांच्या व सामाजीक संस्थेच्या वतीने चहा नाष्टा पाणी फळांचे वाटप करुन वारकऱ्यांची सेवा केली. दुपारच्या विसाव्यानंतर पालखी खडकीमार्गे पुण्यात प्रवेशीला गेली.