गणेशोत्सवात होणार महिला सुरक्षेचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 02:55 AM2017-08-03T02:55:43+5:302017-08-03T02:55:43+5:30
पुण्याच्या गणेशोत्सवात यंदा महिला सुरक्षेचा जागर होणार आहे. सर्व गणेशोत्सव मंडळांनी ‘ती’च्या सुरक्षेची जबाबदारी सामूहिकपणे उचलून ‘तू सुरक्षित आहेस,’ अशा आशयाच्या फलकांमधून प्रचार आणि प्रसार होऊ करण्याचा निर्णय ‘लोकमत’च्या व्यासपीठावर घेण्यात आला.
पुणे : पुण्याच्या गणेशोत्सवात यंदा महिला सुरक्षेचा जागर होणार आहे. सर्व गणेशोत्सव मंडळांनी ‘ती’च्या सुरक्षेची जबाबदारी सामूहिकपणे उचलून ‘तू सुरक्षित आहेस,’ अशा आशयाच्या फलकांमधून प्रचार आणि प्रसार होऊ करण्याचा निर्णय ‘लोकमत’च्या व्यासपीठावर घेण्यात आला. पुण्यातील मानाच्या गणपतींसह प्रमुख मंडळांनी यासाठी पुढाकार घेण्याचे ठरविले आहे.
‘लोकमत’ची ‘ती’चा गणपती ही विधायक चळवळ आणखी पुढे नेताना ‘देऊ या ‘ती’ला सन्मान’ हे यंदाचे ब्रीद ठरविण्यात आले आहे. यासाठी पुण्यातील ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या आणि प्रमुख गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाºयांच्या चर्चासत्राचे आयोजन ‘लोकमत’तर्फे करण्यात आले होते. लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा अध्यक्षस्थानी होते. महिला आणि बालकल्याण समितीच्या अध्यक्षा राणी भोसले, नगरसेविका ज्योत्स्रा एकबोटे, ज्येष्ठ लेखिका अश्विनी धोंगडे, वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. माया तुळपुळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रूपाली चाकणकर, शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा संगीता तिवारी, महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या महिला शहराध्यक्षा रूपाली पाटील, बांधकाम व्यावसायिक दर्शना परमार, वैैद्यकीय तज्ज्ञ डॉ. हरज्योत कौर, उद्योजिका मनीषा अगरवाल, कायदेतज्ज्ञ अॅड. सुप्रिया कोठारी, सामाजिक कार्यकर्त्या अॅड. शैलजा मोळक, गायिका प्रियांका बर्वे, तुळशीबाग गणपती मंडळाच्या वैशाली खटावकर, पूनम शेंडे, प्रीतम कागणे, चंदा पाटील, रोहिना नागपाल, दीपा तावरे, कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, गुरुजी तालीम मंडळाचे पृथ्वीराज परदेशी, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अनिरुद्ध गाडगीळ आणि वर्षा गाडगीळ, चेतन लोढा आदी मान्यवर बैैठकीला उपस्थित होते.
‘लोकमत’चे संपादक ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर, उपाध्यक्ष नीरज महाजन, वरिष्ठ महाव्यवस्थापक निनाद देसाई, महाव्यवस्थापक मिलन दर्डा, राकेश मल्होत्रा उपस्थित होते.
गणपती ही विद्येची, कलेची देवता आहे. गणेशोत्सवाचा सोहळा साजरा होत असताना सर्व स्तरांमध्ये स्त्रियांचा सहभाग, महिलांची सुरक्षितता, पुरेशी आणि स्वच्छ स्वच्छतागृहे, व्यसनमुक्ती, विधायक उपक्रमांना प्रोत्साहन, उत्सवातून प्रबोधन, पुढील पिढीवर चांगले संस्कार आदी बाबींची अंमलबजावणी झाल्यास गणेशोत्सवाचे मंगलमय चित्र अधिकाधिक वृद्धिंगत होईल, अशी अपेक्षा विविध क्षेत्रांतील महिलांनी व्यक्त केली. ‘लोकमत’च्या वतीने पुण्यात गेल्या तीन वर्षांपासून पुण्यात सुरू करण्यात आलेल्या ‘ती’चा गणपती या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
पुण्यातील मंगलमय गणेशोत्सवात महिला सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी अनेक मंडळांनी पुढाकार घेतला आहे. संपूर्ण गणेशोत्सवात याचा जागर सर्व मंडळांतर्फे होणार आहे.
विजय दर्डा म्हणाले, ‘‘ती’चा गणपती या उपक्रमातून समन्वयाची ताकद मिळावी. आपल्या संस्कृतीची पाळेमुळे रुजवताना इतरांच्या संस्कृतीचा आदर करावा, गणेशोत्सवातून सामाजिक प्रबोधन घडावे. स्वच्छता, सुरक्षितता आणि आरोग्याचा प्रश्न मार्गी लागावा आणि समाजात तिचा सन्मान केला जावा.’’
‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर म्हणाले, ‘‘लोकमत’चा ‘ती’चा गणपती ही सांस्कृतिक चळवळ आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने तिला तिचा सन्मान, अभिमान, अधिकार परत मिळावा, हाच या चळवळीमागचा हेतू आहे. ही चळवळ सर्व समाजाची व्हावी, सर्वांच्या सहभागाचे बळ मिळावे, अशी अपेक्षा आहे.’’
लीना सलडाणा यांनी सूत्रसंचालन केले.