महापौरपदी जगताप, उपमहापौर अलगुडे
By Admin | Published: February 26, 2016 04:30 AM2016-02-26T04:30:00+5:302016-02-26T04:30:00+5:30
पुण्याच्या महापौरपदी प्रशांत जगताप यांची, तर उपमहापौरपदी मुकारी अलगुडे यांची निवड झाली. काँग्रेस व राष्ट्रवादीने संयुक्तपणे निवडणूक लढवली, तर सेना-भाजपने दोन्ही पदांसाठी स्वतंत्र
पुणे : पुण्याच्या महापौरपदी प्रशांत जगताप यांची, तर उपमहापौरपदी मुकारी अलगुडे यांची निवड झाली. काँग्रेस व राष्ट्रवादीने संयुक्तपणे निवडणूक लढवली, तर सेना-भाजपने दोन्ही पदांसाठी स्वतंत्र उमेदवार देऊन युतीतील फूट सिद्ध केली. मनसेने तटस्थ धोरण स्वीकारले. राष्ट्रवादीचे जगताप यांना ८४ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे अशोक येनपुरे यांना २५, तर शिवसेनेचे सचिन भगत यांना १२ मते मिळाली. उपमहापौर अलगुडे यांना ८४ मते मिळाली. भाजपच्या वर्षा तापकीर यांना २५ व सेनेच्या योगेश मोकाटे यांना १२ मते मिळाली.
पिठासीन अधिकारी म्हणून पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांनी कामकाज सुरू केले. नगरसचिव सुनील पारखी यांनी त्यांना साह्य केले. मावळते महापौर दत्तात्रय धनकवडे, आयुक्त कुणाल कुमार उपस्थित होते. आमदार मेधा कुलकर्णी व योगेश टिळेकर यांनीही हजेरी लावली होती. सेनेच्या नीता मंजाळकर या नगरसेविका त्यांच्या उमेदवारासाठीची मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सभागृहात आल्या. त्यामुळे त्यांचे मतदान शेवटी झाले. त्यांचे मतदान मोजले गेले नाही. हरणावळ यांनी कृष्णा यांच्या लक्षात ही बाब आणून देण्याचा प्रयत्न केला; मात्र ‘ते नंतर पाहू’ असे सांगून त्यांना गप्प बसवले.
महापौर-उपमहापौरांचे
कोडकौतुक -वृत्त/३
अभिनंदनासाठी सभागृहातच चढाओढ
पारखी यांनी प्रत्येक सदस्याने हात वर करून, स्वत:चे नाव व प्रभाग क्रमांक सांगून मतदान करायचे आहे, असे स्पष्ट केले.मनसेचे गटनेते राजेंद्र वागस्कर यांनी मनसे तटस्थ राहणार असल्याचे सांगितले. मतदानानंतर जगताप व अलगुडे यांची निवड जाहीर करण्यात आली. त्या वेळी अभिनंदनासाठी सभागृहात चढाओढ सुरू झाली. त्यामुळे विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी नव्या महापौरांना व नगरसचिवांना सभेचे कामकाज सुरू करा,असे स्मरण करून दिले. उपमहापौर आबा बागुल, कमल व्यवहारे, रवींद्र माळवदकर, अरविंद शिंदे आदींची जगताप, अलगुडे यांना शुभेच्छा देणारी भाषणे झाली.