सामाजिक प्रबोधनाचा देखाव्यांमधून जागर, शतकोत्तर रौप्यमहोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 01:39 AM2017-09-02T01:39:40+5:302017-09-02T01:39:54+5:30
वात्सल्याचे, मांगल्याचे प्रतीक असलेल्या गणेशोत्सवामधून यंदा सार्वजनिक गणेश मंडळांनी सामाजिक प्रबोधनावरही भर दिला आहे. देखाव्यांमधून सामाजिक, राजकीय, आर्थिक, जागतिक परिस्थितीवर भाष्य करण्यात आले आहे.
पुणे : वात्सल्याचे, मांगल्याचे प्रतीक असलेल्या गणेशोत्सवामधून यंदा सार्वजनिक गणेश मंडळांनी सामाजिक प्रबोधनावरही भर दिला आहे. देखाव्यांमधून सामाजिक, राजकीय, आर्थिक, जागतिक परिस्थितीवर भाष्य करण्यात आले आहे. नोटाबंदीपासून स्त्रीभ्रूणहत्या, सर्जिकल स्ट्राइक, प्रदूषण, भारत-चीन संबंध, दहशतवाद, महिलांवरील अत्याचार अशा विविध घटना अधोरेखित करून प्रबोधनपर जागर करण्यात आला आहे.
बुधवार पेठेतील महाराष्ट्र तरुण मंडळतर्फे ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या जिवंत देखाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. देशाच्या सीमेवर लढणाºया सैनिकांना सरकारकडून सुविधा पुरविल्या जात असल्या, तरीही त्यांच्या कुटुंबीयांच्या अनेक गरजा आजही अपूर्ण आहेत. याकरिता सैनिकांच्या कुटुंबीयांनी राजकीय नेत्यांकडे मदत मागितल्यास अनेक ठिकाणी त्यांना योग्य वागणूक मिळत नाही. त्यामुळे देशाप्रति प्राण अर्पण करणाºया सैनिकांप्रति प्रेम व्यक्त करून त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास गणेशोत्सवातील जिवंत देखाव्याच्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे. श्रीमानयोगी नाट्य संस्थेच्या १० कलाकारांनी सादरीकरण केले आहे.
रविवार पेठेतील श्री अखिल कापडगंज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘वर्दीतील माणूस’ देखावा सादर करण्यात आला आहे. इतरांचे रक्षण करताना मुंबईतील २६-११च्या हल्ल्यामध्ये वेळप्रसंगी आपला जीव गमवावा लागलेल्या पोलिसांनी दाद मागायची कुठे, अशा पोलिसांच्या मनातील विविध प्रश्न आणि अडचणींना वाट करून देत जिवंत देखाव्यातून वर्दीतील या माणसाची व्यथा मांडण्यात आली आहे.
नाना पेठेतील श्री शिवराज मंडळ ट्रस्ट, बोर्ड आळी मंडळाने स्वदेशी तंत्र आणि वंदेमातरम्चा संदेश देणारा जिवंत देखावा सादर केला आहे. वंदेमातरम्ला विरोध करणाºयांचा समाचार घेण्यात आला आहे. हिंद माता तरुण मंडळाने कर्जमाफीच्या घोषणांमुळे हैैराण झालेल्या शेतकरी व सीमेवर लढताना मुलाला मरण आल्यानंतरही धाकट्या मुलाला सैन्यात पाठविणारा शेतकरी बाप यांचे चित्र देखाव्यातून रेखाटले आहे. साखळीपीर तालीम मंडळाने ‘शेतकºयांचे कैवारी शिवाजी महाराज’ या देखाव्यात राज्यावर दुष्काळाचे संकट कोसळल्यावर शिवाजी महाराजांनी काय भूमिका घेतली, हे चितारले आहे. लष्कर परिसरातील कामाठीपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा ‘चिनी वस्तूंवर बंदी’ आणण्याच्या दृष्टीने ‘मेक इन इंडिया’ हा देखावा सादर केला आहे. डोकलाम प्रश्नाबरोबरच चीनकडून भारताला असणारा धोका लक्षात घेऊन चिनी वस्तूंचा वापर टाळावा, यादृष्टीने मंडळाने देखाव्यावर भर दिला आहे.
भाजी मंडई भागातील जय जवान मित्र मंडळाने अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना आदरांजली अर्पण करणारा ‘माणूस म्हणून जगू या’ हा देखावा सादर केला आहे. अशोक चौक मित्र मंडळाने महिलांवर होणारे अत्याचार यावर प्रकाशझोत टाकला आहे. भवानी पेठेतील आझाद मित्र मंडळाने टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पनेवर आधारित व पर्यावरणपूरक सजावट केली आहे. बुट्टी स्ट्रीटवरील पापा वस्ताद गवळी तालीम संघाने यंदा ‘रणरागिणी जागी हो, आजच्या युगाची झाशीची राणी हो’ हा जिवंत देखावा सादर केला आहे. उत्सव संवर्धक संघाने ‘पोलिसांवरील ताण’ आणि ‘चिनी मालावर बहिष्कार’ या विषयावरील जिवंत देखावा साकारला आहे.
राणी लक्ष्मीबाई उद्यानाजवळील शिवमुद्रा प्रतिष्ठानने ‘सेल्फीचे दुष्परिणाम’ हा जिवंत देखावा यंदा सादर केला आहे. श्रीमंत साईनाथ गणेशोत्सव मंडळाने ‘एक गोष्ट-सात तिढा’ हा सामाजिक विषयावरील देखावा सादर केला आहे. श्री राजेश्वर तरुण मंडळ, शिवतेज मित्र मंडळ, नंदनवन तरुण मंडळ, कॉन्वेनंट स्ट्रीट मित्र मंडळ, ओशो मित्र मंडळ, वीर तरुण मंडळ, नवयुग तरुण मंडळ या मंडळांनी साधेपणावर भर दिला आहे.