Maharashtra Bandh: 'महाराष्ट्रातील संकटग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने काय मदत केली ते सांगा'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 03:31 PM2021-10-11T15:31:05+5:302021-10-11T15:32:48+5:30
पुढे बोलताना मुळीक म्हणाले, कोणत्याही घटनेपेक्षा त्यावरील राजकारण दुर्दैवी असते. सरकार पुरस्कृत महाराष्ट्र बंद हा हीन राजकारणाचाच डाव आहे
पुणे: महाराष्ट्रातील शेतकरी व सामान्य जनता संकटांमध्ये होरपळत असताना, उत्तर प्रदेशातील जनतेचे तारणहार असल्याच्या आविर्भावात मंत्रिमंडळाच्या बैठकीत शोकप्रस्ताव संमत करणे ही ठाकरे सरकारची निव्वळ ढोंगबाजी आहे. एक हजार पन्नास कोटींच्या दलालीचे पुरावे आयकर खात्याला सापडल्याने लखीमपूर प्रकरणाच्या ढालीआडून महाराष्ट्र बंद पुकारून या गंभीर प्रकरणावरून जनतेचे लक्ष अन्यत्र वळविण्याचे हीन राजकारण ठाकरे सरकार करत आहे, असा आरोप भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केला. उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखविणाऱ्या ठाकरे सरकारने महाराष्ट्रातील संकटग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर का सोडले, असा सवालही त्यांनी केला.
पुढे बोलताना मुळीक म्हणाले, कोणत्याही घटनेपेक्षा त्यावरील राजकारण दुर्दैवी असते. सरकार पुरस्कृत महाराष्ट्र बंद हा हीन राजकारणाचाच डाव आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत लखीमपूर घटनाग्रस्तांना श्रद्धांजली वाहणाऱ्या ठाकरे सरकारला महाराष्ट्रातील संकटांमध्ये मृत्यू पावलेले शेतकरी, सामान्य जनता आठवली नाही का, त्यांच्यासाठी श्रद्धांजलीचे दोन शब्द सरकारने मंत्रिमंडळात का काढले नाहीत.
राजकारण करून जनतेचे लक्ष समस्यांपासून दूर नेता येईल, पण त्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांवरील कारवाया थांबविता येणार नाहीत. दररोज नव्या भ्रष्टाचाराचे दाखले समोर येत असल्याने, महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून ठाकरे सरकारची होणारी नोंद पुसता येणार नाही. अगोदरच कोरोनाकाळात कंबरडे मोडलेल्या महाराष्ट्रात बंद पुकारून जनतेच्या हलाखीत या राजकारणामुळे भर पडणार आहे, असेही श्री. मुळीक म्हणाले.