‘जागरण गोंधळ’ पडला महागात; वालचंदनगर पोलिसांनी घडवली चांगलीच अद्दल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 01:07 PM2021-03-03T13:07:13+5:302021-03-03T13:32:41+5:30
सोमवारी (दि. १ ) पहाटे पोलीस गस्त घालत असताना कळंब व निमसाखर (ता. इंदापूर) येथे जागरण गोंधळाचा कार्यक्रम सुरू होता...
निमसाखर : निमसाखर (ता. इंदापूर ) वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गावांमध्ये एका कुटुंबाला जागरण गोंधळ चांगलाच महागात पडला आहे. वालचंदनगर पोलिसांनी कोरोना नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रक़रणी दंडात्मक कारवाई केली आहे.
इंदापूर तालुक्यात गावोगावी कोरोना संसर्गजन्य काळात रुग्णांची शंभरी पूर्ण झाली आहे. अशा परिस्थितीत देखील ग्रामीण भागात सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमात वाढ झाली आहे. सोमवारी (दि. १ ) पहाटे पोलीस गस्त घालत असताना कळंब व निमसाखर (ता. इंदापूर) येथे जागरण गोंधळाचा कार्यक्रम सुरू होता. त्यानुसार स्पिकरच्या आवाजावरुन त्या त्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. शासनाने कोरोना संसगार्बाबत घालून दिलेल्या निर्बंध पायदळी तुडवून विना मास्क, सोशल डिस्टन्स न पाळता, स्पिकरचा आवाज मोठा असा जागरण गोंधळ कार्यक्रम चालू असल्याचे दिसून येताच पोलीस उपनिरीक्षक सुभाष मुंढे व चालक पोलीस अंमलदार शेंडकर यांनी त्यांच्यावर एकत्रित कारवाई केली. दरम्यान, संबंधिताना पोलीस स्टेशनमध्ये ताब्यात घेत इलेक्ट्रॉनिक्स वाद्य संच ताब्यात घेतले. यानंतर संबंधितांनी ६ हजार रुपयांचा दंड घेऊन समज देत हे वाद्य परत देण्यात आले.
जिल्हाधिकारी यांनी जनतेच्या कोरोनापासून संरक्षणासाठी कायदे नियम केलेले आहेत .याचा कोणी भंग करत असेल तर पोलीस प्रशासनाकडून गुन्हे दाखल केले जातील. कामाशिवाय घराबाहेर पडू नका. कोरोना पासुन सुरक्षित राहा. मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा, असे आवाहन वालचंदनगर पोलीस स्टेशनकडुन यावेळी करण्यात आले.