प्राप्तिकर विभागाच्या पुणे विभागाकडून ‘जागृती अभियान’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:29 AM2020-12-11T04:29:34+5:302020-12-11T04:29:34+5:30
पुणे : प्राप्तिकराबाबतचे विवाद निकाली काढण्यासाठी केंद्र सरकारने ‘विवाद से विश्वास’ ही योजना आणली आहे. याचा लाभ अधिकाधिक थकबाकीदारांनी ...
पुणे : प्राप्तिकराबाबतचे विवाद निकाली काढण्यासाठी केंद्र सरकारने ‘विवाद से विश्वास’ ही योजना आणली आहे. याचा लाभ अधिकाधिक थकबाकीदारांनी घ्यावा यासाठी प्राप्तिकर विभागाच्या पुणे विभागाकडून ‘जागृती अभियान शिबिर’ घेण्यात येणार आहे. येत्या १४ ते १६ डिसेंबरदरम्यान हे शिबिर घेतले जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुधांशु शेखर यांनी दिली.
केंद्र शासनाने या योजनेची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढविली आहे. या योजनेअंतर्गत करदात्याला कराबद्दलचा कोणताही जुना वाद शुल्क न देता सोडविता येणार आहे. प्रलंबित वाद सोडविण्यासाठी करदाते ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करू शकतील. देशातील न्यायालयांमध्ये ९.३२ लाख कोटींचे तब्बल ४.८३ लाख खटले प्रलंबित आहेत. या योजनेंतर्गत करदात्यांना विवादित कर भरणे आवश्यक असून त्या रकमेवरील व्याज आणि दंडामध्ये सूट दिली जाणार आहे.
आयुक्त (अपील), आयकर अपील न्यायाधिकरण, उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयासमोर कर विवाद, अपिक, दंड आणि व्याजासंबंधित प्रलंबित असलेल्या प्राप्तिकराच्या प्रकरणांसाठी ही योजना लागू आहे. विवाद-से-विश्वास योजनेंतर्गत करदात्यास सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. करदात्यांनी त्यांचा वेळ, ऊर्जा आणि संसाधने वाचविण्यासाठी या योजनेचा लाभ घ्यावा.
चौकट
जागृती अभियानांतर्गत पुणे, नाशिक, ठाणे, कोल्हापूर, पनवेल, कल्याण, औरंगाबाद, सोलापूर आणि अन्य शहरातील स्थानिक प्राप्तिकर कार्यालयांशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रधान मुख्य आयुक्तांनी केले आहे.