जगताप म्हणतात, नजरचुकीने नमूद झाले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:13 AM2021-08-29T04:13:36+5:302021-08-29T04:13:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘दिवसाला दहा लाख रुपये दंड आकारणी करावी, हे नजरचुकीने नमूद झाले होते,’ अशी उपरती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘दिवसाला दहा लाख रुपये दंड आकारणी करावी, हे नजरचुकीने नमूद झाले होते,’ अशी उपरती महापालिकेचे उपायुक्त माधव जगताप यांना शनिवारी (दि. २८) संध्याकाळी झाली. त्यानंतर त्यांनी दंड वसुलीचे २५ ऑगस्टचे आदेश रद्द करण्यात येत असल्याचे नवीन पत्र सर्व क्षेत्रीय कार्यालयांना पाठवले.
महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी जगताप यांची कानउघाडणी केल्यानंतर लागलीच त्यांनी आदेश रद्द करण्याची सूचना केली. परिणामी, जगताप यांनी शनिवारी सुट्टीच्या दिवशीच नवे पत्र काढून,“ कोरोना प्रादुर्भाव वाढू नये याकरिता आवश्यक त्या उपाययोजना सुरू आहेत. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंग, मास्क परिधान करणे याबाबत देखील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती करण्यात आली असल्याने, दंड आकारणी करण्याचे आदेश रद्द करण्यात येत आहेत,” असे सांगितले. दंड आकारणी ऐवजी नागरिकांमध्ये व व्यापारी संस्था या ठिकाणी मास्क परिधान न करणे, सोशल डिस्टन्सिंग न ठेवणे याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे त्यांनी नमूद केले आहे.